पूर्वार्ध
॥ श्लोक ॥
कधींच कळलें मला जइ तुम्ही दुरी ठेविलें ।
भवाब्धिंतुन काढण्या पतित, राहिला एकले ॥
अतां न करणें मला मुळिंच वाद हा त्या विषीं ।
मला त्वरित दाखवा अतुर कोण या मुक्तिसी ॥३१॥
याप्रमाणें उभयतांचा प्रेमसंवाद होऊन खरा मुमुक्षु पहाण्याची जिज्ञासा तिनें प्रकट केल्यानंतर,
॥ ओवी ॥
वृद्धाचा घेऊन वेष । रुक्मिणीसह जगन्निवास ।
अवघ्या क्षेत्र पंढरीस । दारोदार हिंडला ॥३२॥
एका रक्तपित्याचें अमंगल रूप प्रभूनें घेऊन लक्ष्मीसह भिक्षा मागण्यास निघाले.
॥ पद ॥
अतां होई जाई वेड्या । येथूनि जरा दूर ।
येथें नाहीं काहीं पाही, उगा निघे धूर ॥
( चाल ) घाण तुझ्या ही येत तनूला दावि न सडका ओंगळ ऊर ॥३३॥
उलट त्याच्या स्त्रीला अत्यंत रूपवती पाहून जो तो तिला एकीकडे कांहीं भिक्षेचें आमिष दाखवून म्हणूं लागला.
॥ लावणी ॥
तूं चारु तनू गोमटी, कृशांगी कटी ।
शशितुल्य वदन वेल्हाळे, शोभते चिवळ हनुवटीं ॥
नको फ़िरुस याचे संगतीं, सोड हा पती ।
हेकळावरी या वेडे, जाइ न कदा शोभती ॥
तूं योग्य मढ्यासी आतां, तुज नेतों चाल मंदिरीं ॥
भणभणति उरावर किती, मक्षिका अती ।
ना स्थान योग्य हंसांना, थिल्लरीं काक बैसती ॥
गणुदास म्हणे यापरी, पंढरी खरी ।
जाहली अंध कामानें, जनरीत सारुनी दुरी ॥३४॥
रुक्मिणीनें आपला मायेचा बाजार रंगलेला पहातांच तिचें तिलाच हंसूं लोटलें व देवाच्या म्हणण्याची सत्यता पदोपदीं पटूं लागली. याप्रमाणें सगळी पंढरी पालथी घातली पण दाद लागेना. हें पाहून -
॥ आर्या ॥
कंटाळून अखेरी आला तो ईश बोधल्यापाशीं ।
जो निज दर्शनमात्रें पतितांचे पाप ताप हो ! नाशी ॥३५॥
पाटीलबुवा देवाला नैवेद्य दाखविण्याच्या तयारींतच होते. आतां अपाल्याला द्वादशीला एकहि दांपत्य - भोजन घडत नाहीं, याविषयीं वाईट वाटून प्रभूच्या स्मरणानें त्यांचें हृदय भरून येत होतें. तितक्यांत रुक्मिणीसहवर्तमान देव भिक्षेकर्याच्या वेषांत प्राप्त झाले व दीनवाणीनें बोधलेबुवांस म्हणाले.
॥ पद ॥
गज घाट पंढरी भरली । परि सोय मदिय नच झाली ॥बघ कुठें ॥
भडकला उदरिं जठराग्नी । ना दिलें मला बघ कोणी ॥अन्न तें ॥
( चाल ) कामिनी, मदिय ही जाणि, झालि दिनवाणि,
पदहि उचलेना, येउं दे तुला तरि करुणा ॥येधवां॥३६॥
आधींच बोधलेबुवा “ जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत । हा भक्तियोग निश्चित । जाण माझा ॥ ” या भक्तियोगांत पारंगत व त्यांत दांपत्याची मार्गप्रतीक्षा करीत असलेले. मग काय !
॥ ओवी ॥
पाहून त्या दंपतीसी । बोधला सानंद मानसीं ॥
इंदु - दर्शनें चकोरासी । हर्ष जैसा होतसे ॥३७॥
परमात्मा रुक्मिणीसहवर्तमान आनंदानें जेवूं लागला. भक्ताची मीठभाकर दांभिकांच्या पंचपक्वान्नापेक्षां त्याला अधिक मधुर वाटूं लागली व
॥ दिंडी ॥
देइ ढेंकर प्रत्येक घास घेतां । म्हणत, “ जगतीं तूं धन्य पुण्यवंता ।
कोटि ब्राह्मण भोजन घातल्याचें ॥ लाधलें कीं बा ! पुण्य तुला साचें ” ३८
असें म्हणून देव प्रगट झाले.
॥ आर्या ॥
पीत पितांबर धृत जो कंठीं ज्याच्या अपाद वनमाळा ।
तद्दर्शनमात्रें तो भक्तसखा बोधला मनीं धाला ॥३९॥
परमात्म्याचा शेष प्रसाद ग्रहण करून पाटीलबुवा धामणगांवास परत आले.
॥ दिंडी ॥
जमिन काळी बहु थोर गव्हाळीची । पेरण्यातें गहुं स्वारि बोधल्याची ॥
आलि शेता वापसा लवहि होता । मूठ चाड्यावर धरिलि, मोद चित्ता ॥४०
॥ ओवी ॥
तयीं बोधला इच्छी मनीं । कां न मागते येती कुणी ॥
हे पांडुरंगा ! चापपाणी ! । निष्ठुर ऐसा होऊं नको ॥४१॥
बोधलेबुवा चिंताच करीत होते. तितक्यांत,
॥ अभंग ॥
पंढरीचे वारकरी । आले धामणगांवावरी ॥
मुखीं नामाचा गजर । स्कंधीं पताकांचे भार ॥
टाळ विने झांजा हातीं । बहु आनंदें नाचती ॥
गणु म्हणे लोटांगण । घाली पाटिल त्याकारण ॥४२॥
शेतांत थोरल्या पाटीलबुवांना पहातांच वारकर्यांना धीर आला. ते दीनवाणीनें त्याची करुणा भाकूं लागले.
॥ दिंडी ॥
झाले आजी दिन सात अन्न नाहीं । कोणि दाता नुरला किं जगीं पाही ॥
दया तुजला आलिया आज आतां । बहू होतिल उपकार पुण्यवंता ॥४३॥
॥ कटिबंध ॥
तडतडा मुलें तोडितीं, कीं अम्हाप्रती, स्त्रिया बांधिती, पोट पदरानें ॥
ना अन्न पोटिं, जातात झोक वार्यानें ॥
पंढरी, एथुनी खरी, राहिली दुरी, अजून तिन मजला ।
ना कळे कसा भेटेल विठू अम्हाला ॥
रस्त्यांत, होईल प्राणान्त, आमुचा सत्य, अन्न किंचीतची, संग्रहा नाहीं ।
गणु म्हणे झोंबले शब्द तया हें पाहीं ॥४४॥
॥ आर्या ॥
संत - हृदय मेणाहुनि मउ, परदु:खें करून पाझरतें ।
किंवा पाहुनि वत्सा धेनु जशी का क्षणांत पान्हवते ॥४५॥
दयाभूत अंत:करणानें पाटलांनीं मनांत विचार केला कीं, -
॥ लावणी ॥
धर्मक्षेत्र हें सोडुन पेरूं बिज कां मातिंत तरी ।
धेनु त्यागुन कोण पुजाया जाइ खराला तरी ॥
टाकुन गादी निजूं कशाला बळें बोंदर्यावरी ।
उत्तम आला जुळुन योग हा, कैवारी मम हरी ॥४६॥
नुसता विचारच नव्हे तर, -
॥ आर्या ॥
बीज गव्हाचें दिधलें अवघें त्या खावयास मण सात ।
वारकर्या, तत्पद - रज वंदुन बांधी प्रसाद पदरांत ॥४७॥
सात मण गव्हाचें बीं देऊन उलट वारकर्यांविषयीं पाटीलबुवा धन्यवाए गाऊं लागले.
बोधला ( वारकर्यांस )
॥ अभंग ॥
धन्य तुमची माय तुम्हालागी व्याली । वारी ती धरिली, पंढरीची ॥
राम नामांकित मुद्रा अंगावरी । तुळशिची साजिरी, कंठीं माळा ॥
मंगल वदन नामें विठ्ठलाच्या । पताका स्वर्गींच्या स्कंदावरी ॥
गणु म्हणे धन्य तुम्ही वारकरी । येरझार खरी चुकविली ॥४८॥
गव्हाचें बीं दान केल्यानंतर आतां शेतांत पेरावें काय व यमाजीला दाखवावें काय ? या विचारानें -
॥ श्लोक ॥
गव्हा ऐवजीम पेरिले कीं तयानें । कडू भोपळे शेतिं त्य आदरानें ॥
म्हणे हीं फ़ळें तारितातीं पुरांत । कधीं ना बुडे भोपळा ज्या हतांत ॥४९॥
हें वर्तमान यमाजीला - धाकट्या पाटलांना - कळतांच त्यांनीं बापाचा चांगला खरपूस समाचार घेतला.
॥ पद ॥
वाहवा पाटील खूप पेरिले कंदुक निज शेतीं ।
शिरा पुरीच्या भरल्या ताटीं कालविली माती ॥
( चाल ) वाटोळें, तुम्ही केलें, आजि सगळें, खचित खुळे ।
झालां नामस्मरणें हरिच्या जन खदखद हंसती ॥५०॥
॥ ओवी ॥
इकडे कमलनाभ नारायण । बैसला शेताशीं राखण ।
जागल केली रात्रंदिन । आपुल्या भक्ताकरणें ॥५१॥
पाटलाच्या शेतांत कडू भोपळ्याचे वेल उतूं आले. त्या सुगींतच -
॥ आर्या ॥
पुनव नव्याची आली, नसे गव्हाचा घरामधें दाणा ।
जाणुन हें गांवकरी करिति कुटाळी वदून कटु वचना ॥५२॥
॥ दिंडी ॥
पुरण घालुनिया कडू भोपळ्याचें । करा पाटिल सारलेम बलोत्याचें ॥
बरें झालें नव रीत सुरूं केली । भोपळ्याची दैना ति फ़ेडियेली ॥५३॥
॥ ओवी ॥
बोधला न दे प्रत्युत्तर । स्नुषा कांता आणि कुमार ।
करीत बैसले विचार । समय साजिरा होय कैसा ॥५४॥
पाटीलबुवा मुग्ध राहिले, पण कुटाळांना देवानेंच उत्तर दिलें. ज्या दिवशीं कुटळांनीं याप्रमाणें हिणविलें त्याच रात्रीं प्रभूनें लीलामात्रें मोठेंच स्थित्यंतर घडवून आणलें. दुसरें दिवशी सकाळीं चावडीवर सारी पाटील मंडळी व गांवकरी बसले असतां विठ्या महारानें येऊन सर्वांसमक्ष शेताचें वर्तमान सांगितलें : -
॥ छक्कड ॥
काल रातिं पडुनिया हींव मिळाला शिवार मातिंत खरा ।
गेला पाटिल गहूं हरबरा ॥
करडि जवस, जोंधळा ! लाख ती करपुनिया गेली ।
वटाणाचीं हो ! फ़ुलें गळलीं ॥
बोधराज पाटील धन्याचें पिक लइ जोरांत ।
भोपळे आले असंख्यात ॥
पाहूं देहना नजर ठरेना नंबर लइ गहिरा ।
झोंबला नाहिं हींव वारा ॥५५॥
॥ ओवी ॥
बोधला म्हणे यमाजिसी । महार धाडून शेतासी ।
भोपळे आणून वेगेंसी । घर घर एक वांटावा ॥५६॥
पाटलांनीं आज्ञा करतांच,
॥ कटिबंध ॥
भोपळे भरुनि पाटींत, वाटि गांवांत, रुक्मिणीकांत, हर्ष मनिं फ़ार ॥
थोरवी त्यजुनि भक्तार्थ करी जोहार ॥
टाकून किरिट कुंडलें, चिंधुक बांधिलें, पितांबर भले, त्यजुन लंगोटी ।
नेसला विठु सांवळा करामधें कांठीं ॥
दाटले व्योमि सुरवर, वरुण, दिनकर, जोडुनी कर, प्रभूला नमिती ॥
मुखिं म्हणति, “ बोधल्या ! धन्य तुझी बा भक्ती ॥
केलास राबता घरीं, सखा श्रीहरी, न ये तव सरी, कुणाशीं आतां । ”
गणु म्हणे अलौकिक जगतिं साधुची सत्ता ॥५७॥
पौर्णिमेच्या दिवशीं कडू भोपळे घरोघर वाटले जाऊं लागतांच गांवकरी संतापून विठ्या महाराला बोलूं लागले -
॥ छक्कड ॥
आणिलेस कशाला विठ्या ! भोपळे घालुन पाटींत ।
नेउनी टाक उकिरड्यांत॥
काय तया लावून करावी तार भजन गेहीं ।
आम्हां तें योग्य मुळीं नाहीं ॥
वा त्यांस कोरुनी करुनि कटोरा घेउन हातांत ।
फ़िरावें काय भीक मागत ॥
तुझा धनी पाटील बोधला लइ सुरती दाणा ।
पेरिली कडू फ़ळें बघ ना ॥
सणा सुदीचा दिवस आजिचा ओंगळ हें येथ ।
नको ठेवुं आमुच्या दारांत ॥५८॥
गांवांत वांटून राहिलेले भोपळे घरीं आणुन दिल्यावर मामाजीच्या आज्ञेनें
॥ ओवी ॥
इकडे स्नुषा भागीरथी । कंदुक घेउनिया हातीं ॥
बसली चिरावयाप्रती । तों अपूर्व ऐसें वर्तलें ॥५९॥
॥ दिंडी ॥
चिरूं जातां कंदूक, गहूं आले । तयांमधुनी आश्चर्य फ़ार झालें ॥
म्हणे भागिरथी, “ धन्य श्वशुर माझा । साह्य करितो त्या पंढरिचा राजा ॥
हा चमत्कार बोधलेबुवा समक्ष पहात होते. तोंच विठ्या महार दारांत आनंदानें उड्या मारीत होता. पाटलाचें लक्ष तिकडे जातांच त्यांनीं प्रभूला ओळखिलें.
बोधला ( देवास ) -
॥ पद ॥
मी ओळखिलें बा ! तुजला । तूं धेड नससि घननीळा ॥ श्रीहरी ॥
हा हीन वेष जगजेठी ! । का धरिलास माझ्यासाठीं ॥ श्रीहरी ॥
( चाल ) धि:कार असो हा मला, म्यांच शिणविला, तात मम भला,
भीमातटवासी । बोधला लागे पायांसी ॥ तेधवां ॥६१॥
कडू भोपळ्यांतून गहूं निघाले. गव्हाचे नाना पदार्थ करून प्रभूसह सर्वांनीं प्रेमानें भोजन केलें -
॥ अभंग ॥
स्नुषा, सुत जाया रुक्मिणीचा पती । घेऊन संगाती जेवावया ।
पाटील बैसले, धन्य तें सदन । जेथें नारायण प्रगटला ॥
धन्य धामणगांव, धन्य बोधराज । ज्याची राखी लाज पांडुरंग ।
गणु म्हणे अवघा गांव शरण आला । कृतार्थ तो झाला संत संगें ॥६२॥
सारा गांव माणकोजी पाटलांचा जयजयकार करून त्यांना धन्यवाद देऊं लागला.