धवलेरीचा गाणॉं
सातशे कुर्हाडी नवशे दांडं
खांदी घेतल्या तिक्क्याच्या कुर्हाडी
देव गेलं खणगर डोंगरी
खालच्या नंजरा वरतं गेल्या
वरच्या नंजरा खलतं गेल्या
निंघून गेलं चंदन डोंगरी
चंदन डोंगर निहालेला
त्यांही चंदना पारखीला
उंगवत मावलंतं घावू घातलं
त्यांही चंदन तोडीयेला
पालव टाकला बुड टाकला
मधला वोंढा तुकीयेला
नेऊन टाकला सुताराचे दारी
सुतारे दादा निजला का जागा
डोळ्यांनी निजला कानाला जागा
ते चंदनाचं पाटू घडला
नेऊन टाकला कातारेवले
कातार्याने कातीयेले, रंगार्याने रंगीयेला
नेऊन टाकला मंडपादारी
बोलवा चौघी सवासनी
आणा आणा गंगंचा पाणी
आणा आणा गायीची शेणा
आरवणा घाला सारवण घाला
आणा आणा कणकी पिठा
चारी रेघा सारख्या ओढा
चारी कोनू सारखे वोला
त्यावं ठेवा चंदन पाटू
त्यावं ठेवा तील तादू
त्यावं तांबली पैसा
लगावर्या उभी करा
मधे तुमी पडदा धरा
टाका टाका मंगलसूत्र
भरा भरा त्यांची आंजुली
त्यावं ठेवा नागवेला पानां
त्यावं ठेवा तांबली पैसा
बोलवा बोलवा कोणू देवा
बोलवा धनतरी माता, बोलवा कणसरी माता
बोलवा रामलक्षुमन, बोलवा त्यांच्या भारजा
बोलवा साती समींदर, बोलवा सोला सारणी
बोलवा बत्तीस पोह्या
बोलवा केवल भाटं, बोलवा वालू भाटं
बोलवा किंबा, बिंबा
बोलवा पिपल्या दुरंग, बोलवा निंबर्या दुरंग
बोलवा माहुली दुरंग, बोलवा खणगर दुरंग
बोलवा मुसल्या दुरंग, बोलवा भिल्ला दुरंग
बोलवा महालक्ष्मी, बोलवा वज्रादेवी
बोलवा बहरमदेवा, तुम्ही येवा मंडपादारी
बोलवा आबजुगं, बोलवा गाजंवीजं
बोलवा ढगमेघ, बोलवा पावशादेव
बोलवा कोणू देवा, बोलवा कोणू देवा
बोलवा शीवंचा चेडा, बोलवा वाघोबा देव
तुमी येवा मंडपादारी, लगीनाच्या झाल्या वेला
बोलवा मारवती देवा, बोलवा जरीमरी
बोलवा गावदेवा, तुमी येवा मंडपादारी
बोलवा गावचा पाटील, बोलवा गावचा काठ्या
बोलवा सुईण आऊ, बोलवा भगतभाऊ
आंबू जांबू जांबे घोडे, दांडे डौले झिनू घाला
जांबे घोडे शिवणार करा
बसा रं देवा दांडे डौले, लगीनाच्या झाल्या वेला
काली गाथी पांढरी पाती
कुलंबी कोसा मग्गीर मासा
सावधान होपन्या
(तिक्क्याच्या-पोलादाच्या, तुकीयेला-उचलला, निहालेला-न्याहाळला, लगावर्या-नवरनवरी, सारणी-नदी, पोह्या-ओढे, केवळ-रेती, वालू-वाळू, दुरंग-डोंगर, आबजुगं-आभाळ, काठ्या-कोतवाल, आऊ-आई, झिनू-जीन, भारजा-बायको)
धवलेरीचे गाणे
सातशे कुर्हाडी नऊशे दांडे
खांद्यावर घेतल्या पोलादी कुर्हाडी
देव गेले खणगर नामक डोंगरी
खालच्या नजरा वरती गेल्या
वरच्या नजरा खाली आल्या
गेले चंदनाची झाडे असलेल्या डोंगरी
चंदनी डोंगर न्याकाळला
त्यांचा चंदनाची झाडे पारखली
पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत घाव घातले
चंदनाचे झाड तोडले
पाला टाकून दिला, मुळे टाकून दिली
मधला ओंडला तेवढा उचलला
सुताराच्या दारी नेऊन टाकला
सुतारादादा निजला आहेस की जागा आहेअ?
-डोळ्यांनी निजलेला, कानाम्नी जागा आहे!
त्याने त्या चंदनाचा पात घडवला
कातार्याने कातला, रंगार्याने रंगवला
मंडपाच्या दारी ठेवला
आता चौघी सवाष्णी बोलवा
गंगेचे पाणी आणा
गायीचे शेण आणा
आरवण-सारवण घाला
कणकेचे पीठ आणा
पिठाने चौकोनाच्या चार समान रेघा ओढा
चारी कोन समान असू द्या
त्यावर चंदनाचा पाट ठेवा
त्यावर ताळ, तांदूळ ठेवा
त्यावर त्यावर तांब्याची पैसा थेवा
नवरानवरींना उभे करा
मध्ये आंतरपाट धरा
नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घाला
दोघांनी आता ओंजळ धरा
ओंजळीत नागवेलीची पानं ठेवा
पानांवर तांब्याचा पैसा ठेवा
आता देवांना आमंत्रण द्या
धरित्री मातेला बोलवा, कणसरी मातेला बोलवा
रामलक्ष्मण सह त्यांच्या बायकांनाही बोलवा
सात समुद्र बोलवा, सोळा नद्यांना बोलवा
बत्तीस ओढ्यांना बोलवा
वाळूचे किनारे बोलवा, रेतीचे किनारे बोलवा
किंबा-बिंबा या डोंगरांना बोलवा
पिपल्या-निंबार्या डोंगरांना बोलवा
महालक्ष्मी देवाला बोलवा, बज्रेश्वरी देवीला
बहिरम देवाला बोलवा-तुम्ही मंडपादारी यावे!
आभाळाला बोलवा, बिजेला बोलवा
ढगामेघांना बोलवा, पावशा देवाला बोलवा
पहा अजून कोणकोणते देव राहिले आहेत...
त्याही सगळ्यांना बोलवा
शिवेवरचा चेडा बोलवा, वाघोबा देवा बोलवा
तुम्ही मंडपादारी यावे, लग्नाची वेळ झाली आहे
मारुतीला बोलवा, मरीमरीला बोलवा
गावदेवाला बोलवा, तुम्ही मंडपादारी यावे!
गावच्या आईला बोलवा, भगतभाऊला बोलवा
आंबू जांबू जांबे घोडे, दांडे डौले-जीन घाला
जातीवंत घोड्यांना चांगले सजवा
देवदेवतांनो येऊन बसा, लग्नाची वेळ झाली आहे
जांबे घोडे श्रृंगारा!