लग्नाची गाणी - सुलनीनाचा गाणॉं
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
सुलनीनाचा गाणॉं
सुलग्ना लागेली चांद सूर्याची
आकाशी मंडपू पाताली बाहोली
सूर्यानं परणली किरणापत बाल
चांदानं परणली रोहणापत बाल
सुलग्ना लागेली ब्रह्मदेवाची
सुलग्ना लागेली ढगानदेवाची
ब्रह्मानं परणली रेघापत बाल
ढगानं परणली मेघापत बाल
सुलग्ना लागेली नारानदेवाची
सुलग्ना लागेली पावशादेवाची
नारनानं परणली लखमापत बाल
पावशानं परणली धारापत बाल
सुलग्ना लागेली रामलक्षुमणाची
सुलग्ना लागेली लंकेव्या रावणाची
रामानं परणली जानकी ग सीता
लक्षुमणानं परणली पारापती बाला
रावाणानं परणली मांडवधरी कन्या
सुलग्ना लागेली वाघोबा देवाची
सुलग्ना लागेली हिरोबा देवाची
वाघोबानं परणली गाव ग देवी
हिरोबानं परणली तुलसापत बाल
सुलग्ना लागेली ’जगन’ बालाची
जगननं परणली ’तरू’ बाल
सुलग्नाचे गाणे
सुलग्न लागले चंद्र-सूर्याचे
आकाशाचा मांडव पाताळाचे बोहले
सुर्याने लग्न केले किरण या कन्येशी
चंद्राने लग्न केले रोहिणी या कन्येशी
सुलग्न लागले ब्रह्मदेवाचे
सुलग्न लागले ढग-देवाचे
ब्रह्माने लग्न केले रेघा या कन्येशी
ढगाने लग्न केले मेघा या कन्येशी
सुलग्न लागले नारादेवाचे
सुलग्न लागले पावशादेवाचे
नारानाने लग्न केले लक्ष्मी या कन्येशी
पावशाने लग्न केले धारा या कन्येशी
सुलग्न लागले राम-लक्ष्मणाचे
सुलग्न लागले लंकेच्या रावणाचे
रामाने लग्न केले जानकी-सीतेशी
लक्ष्मणाचे लग्न केले पार्वती या कन्येशी
सुलग्न लागले वाघोबा देवाचे
सुलग्न लागले हिरोबा देवाचे
वाघोबाने लग्न केले गावदेवीशी
हिरोबाने लग्न केले तुळस या कन्येशी
सुलग्न लागले ’जगन’ बाळाचे
जगनने लग्न केले ’तारू’ या कन्येशी
(शेवटच्या दोन ओळींमध्ये ज्यांचे लग्न आहे त्या वधूवरांची नावे गुंफ़ली जातात.)
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP