स्त्रीगीत - घाण्याची ओवी
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
(विवाह प्रसंगी 'घाणा' भरण्याची एक मंगल प्रथा आपल्याकडे आहे. त्यावेळी सुवासिनी ओव्या म्हणून प्रसंगाला शोभा आणतात. अशा प्रसंगी साजेशा ओव्या खाली दिल्या आहेत.)
प्रारंभी नमन । करूं मोरयाला
या हो सिध्दतेला । सर्वां आधी ॥१॥
तुम्ही येता क्षणी । पळती विघ्ने दूर
प्रताप एसा थोर । काय वानूं ॥२॥
मंगल कार्य हे ।----बाईचे
लाडक्या बहिणीचे । भावंडांच्या ॥३॥
काय बाई सांगू । भाग्याची माझी लेक
होतसे कवतुक । घरी दारी ॥४॥
म्हणती लेकीवर । बापाची माया मोठी
परघरी जाणार ती । म्हणुनी का ? ॥५॥
पाहुनी शुभ दिन । मुहूर्त आज केला
पाच सुवासिनी आल्या । मदतीला ॥६॥
नको कांही उणे । तयारी जय्यत
ठेवावी बडदास्त । पाहुण्यांची ॥७॥
चौरंगी बैसरोनी । विहीणींचे पाय धुवा
नारळ बाई हवा । ओटीसाठी ॥८॥
लाडू गडू परी । धीवर तारफेण्या
रुखवता शोभा आणा । कौशल्याने ॥९॥
बापाजी तालेवार । खिसा ठेवा जरा सैल
लग्नाचा डामडौल । आहे मोठा ॥१०॥
दारी घातलासे । मांडव ऎसपैस
पाहूणे शेपन्नास । यायचेत ॥११॥
येणार्या सकलांची । चौकशी करा नीट
खाण्यापिण्याची कपात । करूं नका ॥१२॥
झाल्या केल्यासाठी । जोडावे गणगोत
सारी माणसे हवीत । कार्यामधे ॥१३॥
आल्या सार्याजणी । मावशी आत्या मामी
कौतुका नाही कमी । ----ताईच्या ॥१४॥
धुमधडाक्यांत । लग्नाचा करूं थाट
वरद राहो हस्त । अंबाबाईचा ॥१५॥
N/A
References : N/A
Last Updated : October 19, 2012
TOP