स्त्रीगीत - गोपाल काला
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
आणा शिदोर्या चला सख्यांनो यमुनेला जाऊ
सख्यांनो यमुनेला जाऊ
कृष्ण करितसे गोपाल काला प्रसाद तो घेऊ ॥धृ॥
कृष्ण कन्हैया नंदाचा
असे लाडका सकलांचा
वेडे केले गोकुळ अवघे त्यास चला पाहूं ॥१॥
संथ वाहते ती यमुना
शोभा येई कुंजवना
नाचे खेळे त्यांत चला ग परब्रह्म पाहूं ॥२॥
कांदा भाकर आणि चटणी
साखर पोहे दही लोणी
गोपगोपींच्या ओळीत बसुनी वनभोजनी जेवूं॥३॥
गोपाळांच्या मेळ्यांत
कृष्ण खेळतो मोदांत
त्या खेळाच्या रंगी रंगुनी कृष्णरूप होऊं ॥४॥
अहंकार तो विसरूनी जा
समुदायाशी तद्रुप व्हा
एकत्वाच्या आनंदाचे स्वरूप ग पाहूं ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP