स्त्रीगीत - मुलीचा पाळणा
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
(चाल ही एक आंस मनी उरली कन्हैया)
नीज निज बालिके देउनि झोके गाते अंगाई ॥धृ॥
लाडकीच पहिली वहिली
सत्कुलांत तूं अवतरली
भाग्यवती कन्या झाली
शुभ आशिर्वाद सकलांचा घेई ॥१॥
तेजस्विनी हो बुध्दिमती
शीलवती हो धैर्यवती
गुणवतीच हो यशवंती
स्वगुणांनी स्वकुला उजळुनि देई ॥२॥
द्रौपदी अहल्या सीता
त्यापरीच हो तूं दुहिता
होईन धन्य मी माता
वंशाची शोभा वाढव बाई ॥३॥
ईशाचे छत्र कृपेचे
आजी आजा मातृपितयाचे
लाभुं दे तुला जन्माचे
जीवनी आपुल्या विजयी होई ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP