स्त्रीगीत - डोहाळे
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
सखे ग बाई गुपित तुझे कळले
स्त्रीजन्माचे आज तुझ्या गे सार्थक ते जाहले ॥धृ॥
नवा फुलोरा ये वेलीवर
नव धान्याचे फुटले अंकुर
सुफलित होई वंश तरुवर
दोन मनांचे, दोन जीवांचे मंगल मीलन झाले ॥१॥
प्रसन्न वृत्ती ठेव हासरी
मनी आठवी सदा श्रीहरी
थोरांचे शुभ आशिष घे शिरी
उभय कुलांना भूषविण्याचे भाग्य तुला लाभले ॥२॥
सुखद क्लेश ते तू अनुभवसी
रात्रंदिन त्या नादी रंगसी
आनंदाने हरखुन जासी
नव्या जीवांच्या चाहुलीने तव मनहि आनंदले ॥३॥
नव्या नवतिचा साजहि हिरवा
नव्या प्रीतिचा रंगहि हिरवा
हिरवा शालू चुडाहि हिरवा
हिंदोळ्यावर बसवूनिया तुज बांधिती फुलझेले ॥४॥
तुला सद्गुणी पुत्र होऊं दे
आकांक्षा तव पूर्ण करूं दे
वंशाचे सौभाग्य उजळू दे
सप्रेमाने आज तुझे मी अभिष्ट चिंतियले ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : October 21, 2012
TOP