स्त्रीगीत - डोहाळे
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
मातृत्वाची सुखद कल्पना सोहवी माझ्या मना
सखे ! मज स्वर्ग वाटतो उणा ॥धृ॥
हवे नकोसे म्हणती झाले
आणवा कांही मेवा सुफळे
थट्टा करिती सगळे म्हणती चिंचा बोरे आणा ॥१॥
इवल्या इवल्या बाला जिवाची
चित्रे रेखित बसते साची
आत्मानंदी रंगुनि जाते शोधित पाऊलखुणा ॥२॥
रम्य उपवना वाटे जावे
पुष्पांचे कौतुक बघावे
लतावेलीसह गुज करावे मंगलमय त्या क्षणा ॥३॥
शुभ्र रुपेरी पुनव चांदणे
सख्यासंगती विहार करणे
अर्थ नवा जीवनी पाहणे फुलवित कवि कल्पना ॥४॥
वंशाचा हा जपते अंकूर
वाढवीन मी होउनि तत्पर
नव्या पिढीचा बाई घरांत येइल हो पाहुणा ॥५॥ ऐ
N/A
References : N/A
Last Updated : October 21, 2012
TOP