कृष्णदासकृत पदें २७ ते ३०
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २७ वे.
पुंडलीकें रचिली पेठ । भूवैकुंठ, ॥ध्रुवपद.॥
वैकुंठाहून श्रीहरी । आले चंद्रभागातीरी ।
कर ठेउनि कठावरी । सम पद नीट ॥पुंडलीके०॥१॥
दिव्यरूप मनोहर । कांसे शोभे पीतांबर ।
गळां वैजयंती हार । माथां मुगुट ॥पंडलीकें०॥२॥
कौल दिधला पुंडलिकानें । ‘या रे ! यारे !’ अवघे जन ।
नामसौदा भरा तेणें । करावी लूत ॥पुंडलीकें०॥३॥
दिंडया पताकांचे भार । वैष्णव मिळाले अपार ।
करिती नामाचा गजर । कलकलाट ॥पुंडलीकें०॥४॥
ऐसा थाट नाहीं कोठें । देव उभाउभीं भेटे ।
खळा तत्काळ पाझर फुटे । सद्नदीत कंठ ॥पुंडलीके०॥५॥
सर्व गोकुळिंची रचना । संगें घेउनी यादवराणा ।
गोपाळपुर वसविलें जाणा । सुंदर हाट ॥पुंडलीके०॥६॥
आषाढी कार्तिकी महा पर्वणी । सुखर येताती धांवोनी ।
अठ्ठयशीं सह्स्त्र ऋषिमुनी । मिळाला थाट ॥पुंढलीकें०॥७॥
नाम ब्रम्हा हें पंढरी । कर्म ब्रम्हा काशीपुरी ।
ओढया जगन्नाथ नगरी । अन्न ब्रम्हा स्पष्ट ॥पुंडलीकें०॥८॥
उत्तम नरदेह पावुनी । पांडुरंग पाहावा नयनीं ।
ऐसें दैवत त्रिभुवनीं । नाहीं कोठें ॥पंडलीकें०॥९॥
विनवी कृष्णदास सकळांसी । धरा निश्चय मानसीं ।
ठाव देईल चरणांसी । सन्निध निकट ॥पुंड्लीकें०॥१०॥
पद २८ वें.
औदुंबरवासी मज । तारिं तारिं हो ! ॥ध्रुवपद.॥
श्रीभीमाकृष्णातटीं । संगमिं राहुनि निकटीं ।
दासाचें सर्व भय । वारिं वारिं हो ? ॥ औदुंबरवासी०॥१॥
पोटशूळ महाव्याधी । भूत प्रेत समंधादी ।
आर्तिसमयी दंड त्यासी । मारिं मारिं हो ! ॥औंदुबरवासी०॥२॥
विनवी दासानुदास । हरवी संसारत्रास ।
कृष्णदास भाविकास । तारिं तारिं हो ! ॥औंदुबरवासी०॥३॥
पद २९ वें.
तुजला मी शरण श्रीपादराज ।
बुडतों भवसिंधूमाजी तारीं राखीं लाज ॥ध्रुवपद.॥
भोगियलें सुख दु:ख पाप पुण्यें करोनियां ।
नाना योनी फिरोनियां नरदेहीं आलों आज ॥तुज०॥१॥
दीपपतंगाचे परी संसाराची प्रीति भारी ।
तव भक्ति सोडोनियां विषयाची करी काज ॥तुज०॥२॥
तापत्रयवडवाग्नीनें पोळलों मी नरहरी ! ।
कृष्णदास दीनावरी कृपा करिं महाराज ॥तुज०॥३॥
पद ३० वें.
दत्तात्रया ! श्रीपाद नरहरी ।
तारीं रे ! भ्क्तकाजकैवारी ।
सर्वार्थदायी दीनाची आई त्वरें कृष्टा करीं ।
धांवें पवेम झडकरीं । भस्म अंगीं त्रिशूलधारी ॥ध्रुवपद.॥
गजेंद्रासी नक्रें धरियलें सरोबरीं ।
स्मरतां घेउनि चक्र आलासि करीं ।
उद्धार करुनि नेलें वैकुंठासी तेणें परी ॥दत्तात्रया०॥१॥
प्रल्हादासि गांजितसे परोपरी ।
प्रगट होऊनि स्तंभीं दैत्यातें मारी ।
आठवुनि ब्रिद ऐसें भक्ताभिमान धरी ।
तेणें परि धांवें पावें झडकरीं ॥दत्तात्रया०॥२॥
द्रौपदिचीं बस्त्रें फेडी दु:शासन दुराचारी ।
राखियली लाज तिची सभेमाझारी ।
प्रीतीनें सतत कृष्णदासाचें पाळण करी ।
तेणें परि धांव झड्करि ॥दत्तात्रया०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP