रामकविकृत पदें १०४ ते १०६
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १०४ वें.
कृष्णस्मरणीं निशिदिनिं रत । अन्य तूं न जाणें ॥ध्रुवपद.॥
निरहंकृति कर्म करुनि ईश्वरा अर्पण करणें ।
येणें संचित क्रियमाण जाळुनि मोक्षपदी रमणें ॥कृष्ण०॥१॥
चराचरभूतीं देव स्मरुनि भक्तिभाव धरणें ।
हेंचि हें साधन सतत विवेकबळें भवाब्धितें तरणें ॥कृष्ण०॥२॥
कलिमाजि श्रेष्ठ साधन कीर्तनसुख घेणे ।
कामक्रोधलोभ त्यजुनि रामकृष्ण मुखीं वदणें ॥कृष्ण०॥३॥
नरतनुमाजि सार्थक वदे आज्ञा करि श्रवणें ।
गुरुभक्ति प्रेमभावें हाचि बोध राम म्हणे ॥कृष्ण०॥४॥
पद १०५ वें.
आज कृष्ण मी पाहिला । तेणें ब्रम्हानंद जाला ॥ध्रुवपद.॥
जो अलक्ष अगोचर । तोचि सतत हृदयी ध्याला ॥आज०॥१॥
त्रैलोकीं व्यापक असे । हाचि चराचरभूती देखिला ॥आज०॥२॥
सर्वभावें भक्ति करुनि । जन्ममरणमोह नासिला ॥आज०॥३॥
राम प्रेमभावें अनन्य । कृष्णचरणी ठाव द्या मला ॥आज०॥४॥
पद १०६ वें.
अरे मना ! रामनाम स्म्रर अहर्निशीं ॥ध्रुवपद.॥
विषयाचा छंद फार । येणें सुख घेसी अपार ।
परिणामीं विष थोर । काळ तुला ग्रासी ॥अरे०॥१॥
जन्मोजन्मीं दु:ख जालें । देहध्यासें भुलविलें ।
आयुष्य तुझें व्यर्थ गेलें । विचार न करिसी ॥अरे०॥२॥
आतां तूं ऐसें कर । चराचरी देव स्मर ।
तेणें जन्म नाशकर । सुख घे दिननिशीं ॥अरे०॥३॥
नरतनूंत येउनि । स्वहित कर उमजुनि ।
राम म्हणे शरण । प्रेमें जा कृष्णासी ॥अरे०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP