रामकविकृत पदें ९४ ते ९६
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ९४ वें.
सावध आतां होईं । संतांसि शरण जाईं. ॥ध्रुवपद.॥
जननीजठरी जन्मलासि । नामरूप घ्यास धरिसि ।
विषयाते भुललासि । येणे गति तुज कैसी ॥साव०॥१॥
योषितेचि प्रीत ऐसी । रात्रंदिवस क्रीडा करिसि ।
हानि केली आयुष्यासि । अझुन विचार न करिसी ॥साव०॥२॥
संसाराचा छंद धरिसि । द्रव्याचाहि लोभ करिसी ।
कन्यापुत्रां लुब्ध होसि । परावृत्ति नाहिं मनासि ॥साव०॥३॥
आतां तूं ऐसें करीं । संतवाक्य मनीं धरी ।
प्रेमेकरुनि हरितें स्मरी । येणें जन्ममरण वारीं ॥साव०॥४॥
राम म्हणे संतमहिमा । जगिं दुजी नाही उपमा ।
म्हणोनि शरण आलों तुम्हां । आतां मजवर करा प्रेमा ॥साव०॥५॥
पद ९५ वें.
आतां तूं ऐसें करी । गोपाळातें स्मरी ॥ध्रुवपद.॥
शमें इंद्रियनिग्रह कर । मनीं सोडी विषयधार ।
‘अहं ब्रम्हास्मि’ स्मर । मग नाशीं हा संसार ॥आतां०॥१॥
नवविधभक्तिनिवेदन । निजहंकृति करिं अर्पण ।
बुद्धिमधिं धरिं घ्यान । निवारीं जन्ममरण ॥आतां०॥२॥
सर्बभूतीं देव पाहीं । हाचि भक्तिभाव घेईं ।
हरिची स्मृति प्रकाश हृदई । मग सुखें निर्भय होईं ॥आतां०॥३॥
राम म्हणे गुरुसि शरण । ब्रम्हानंदें परिपूर्ण ।
सप्रेम भावें भक्ति करुन । चरणीं मस्तक ठेवी ॥आतां०॥४॥
पद ९६ वें.
धन्य धन्य सद्रुरू कृपावंत । चरणीं ठेविन भाव अखंडित ॥ध्रुवपद.॥
देहासहित द्दश्य भाव गेला । निरहंकृति मना लय जाला ।
तिही लोकीं देव प्रकाशला । ऐशा बाधे आनंद पूर्ण जाला ॥धन्य०॥१॥
जाय स्वप्न सुषुप्ति वावजाली । तुर्या सतत एकत्वें प्रकाशली ।
नैष्कर्म कर्में ब्रम्हार्पण जालीं । स्वस्वरूपी बुद्धि स्थिरावली ॥धन्य०॥२॥
क्षराक्षर अभ्यावी द्वैत गेलें । जन्ममरणासि मरण सहज आलें ।
प्रेमभावें समरस अवधें जालें । निजरूपीं लक्ष पूर्ण ठेलें ॥धन्य०॥३॥
राम म्हणे गुरूचे उतराई । कैसा हौं मज ज्ञान नाहीं ।
म्हणुनी मीच नाहिं नाहिं । गुरुचि स्मृति एकचि असे तेहि ॥धन्य०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP