नामदेवकृत पदें ४६ ते ४९
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ४६ वें.
गडे ! हो ! राजा कीं रे ! झाला । कृष्ण सिंहासनीं बैसला. ॥ध्रुवपद.॥
पांवा मोहरी घोंगडी । आम्ही खेळों यमुनाथडी ।
कृष्ण आमुचा कीं रे गडी । यमुनेच्या पैलयडी ॥गडे०॥१॥
टाकुनी काळा कांबळा । कांसे पीतांबर कसिला ।
आतां काय बागुलभय त्याला ॥गडे०॥२॥
खेळों हुतूतू हुंबरी । थडका हाणों टीरीवरी ।
हा तों चालिला दळभारीं । आमुचे यशोदेचा हरी ॥गडे०॥३॥
तुम्ही आम्ही संगें जेवूं । गाइ वळावया जाऊं ।
याच्या मानेंत बुक्या देऊं । आतां जवळि जातां भिऊं ॥गडे०॥४॥
नामा म्हणे चला जाऊं । जवळि जाउनि उभे राहूं ।
पायां पडोनि मागुनि पाहूं । जनीं वनीं कृष्णजी पाहूं ॥गडे०॥५॥
पद ४७ वें.
कैसी हो ! केली देवा ! ठकवूनि दीनाची सेवा ॥ध्रुवपद.॥
पहा जगाची जी आई । जिचें नांव रखुमाबाई ।
तिनें पाणी आणावेम काई । कुंभारीण होऊनीयां ॥कैसी०॥१॥
देवा ! गरुड तुमचें वहान । पक्ष्यांमाजी इंद्र जाण ।
त्यानें गाढव होऊन । माती आणावी काई ॥कैसी०॥२॥
जळो जळो हा संसार । कर्म बळिवंत दुस्तर ।
शिणविला रुक्मिणीवर । नामा म्हणे भक्तिनें ॥कैसी०॥३॥
पद ४८ वें.
विठ्ठलाचा धर्म जागो । तयाच्या चरणीं लक्ष लागो ॥ध्रुवपद.॥
या जंबुद्वीपामाजी एक पंढरपुरगांव ।
धर्माचें नगर तेथ विठोपाटील त्याचें नांव ॥तयाच्या०॥१॥
भाव आणि भक्तिचा जेणें गुंफिला झेला ।
विठ्ठल दातयाच्या घरा उचित नेला ।
उचित पाहुनियां जन्म वेगळा केला. ॥तयाच्या०॥२॥
सुदामा ब्राम्हण थोर दारिद्र पीडिला ।
मूठभर पोहयांसाठीं हेमपुरी पावला, ॥तयाच्या०॥३॥
नामा म्हणे देवराया ! आम्हां तारीं श्रीहरी ! ।
तुजवीण कोण काया धांबूनि येई बा ! सत्वरी, ॥तयाच्या०॥४॥
पद ४९ वें.
धांव रे ! पांडुरंगा । भक्ताचिया अंतरंगा ॥
पाव रे ! संकटी बा ! गोरोबाच्या प्रसंगा ॥ध्रुवपद.॥
गोरोवा भक्त तुझा । माती तुडवितां पाहीं ॥
तुझिया नामस्मरणें । भान देहाचें तें नाहीं ॥
एकुलता एक पुत्र । नकळत तुडविलाही ॥धांव०॥१॥
एकुलता एक पुत्र । तुडवितां निमाला ॥
संतान बुडालें गा ! । तुज स्मरतां विठ्ठला ! ।
लाज ही कोणाची वा ! गेली राखीं ब्रिदाला ॥धांव०॥२॥
कीर्तनीं नामदेव । हांका मारी विठ्ठलाला ॥
गोरोबाच्या कांतेची । दया येऊं दे तुजला ॥
झाली कृपा नामा म्हणे । पुत्र राम्गतचि आला ॥धांव०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP