मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
रामकविकृत पदें १०७ ते ११०

रामकविकृत पदें १०७ ते ११०

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद १०७ वें.

अरे जिवा ! कृष्णचरणी रत होईं दिननिशी ॥ध्रुवपद.॥
संसाराचें दंभ धरोनि । नानापरि सुख घेउनि ।
देह धर्म लोभ करूनि । येणें फजित होसी ॥अरे०॥१॥
योषिता प्रिय अपार । काम लोभ अंतीं थोर ।
वासना तुझी अनिवार । व्यर्थ तूं लुब्ध होसी ॥अरे०॥२॥
अजुनि तुझी तृप्ति नाहीं । कायकर्म करिसि पाहीं ।
स्वर्ग इच्छा धरिसिहि । येणें दु;ख पावसी ॥अरे०॥३॥
अविद्या अभ्यास बहु केला । याचा अहंकार जाला ।
विनय विनव्यर्थ गेला । भसें बुडालासी ॥अरे०॥४॥
आतां तुझेसें करीं । द्दश्य सर्व विसरी ।
हरिचें ध्यान सतत करीं । हरिचरण विसरूं नका ।
मायेचा चुकवा धका । भक्ति  करा अहर्निशीं ॥अरे०॥६॥

पद १०८ वें.

निर्गुणपदिं मी जाउं । कैसें बाई ! ॥ध्रुवपद.॥
पिंडब्रम्हांड विस्तारलें थोर । याचा लोभ मला असे बहु ॥कैसे०॥१॥
निगम अगोचर मनासि अप्राप्य । तेथें मी कोणे बोधी ध्याऊं ॥कैसे०॥२॥
कृष्णा कृपा करीं स्मृति हृदयी देई । या बळे निजपद पाहूं ॥कैसे०॥३॥
अच्युतसुत राम अनन्य । सतत हरि मुखीं गाउं ॥कैसे०॥४॥

पद १०९ वें.

यमुनेतीरीं आहे गोपाळ कैसें करूं ॥ध्रुवपद.॥
श्यामसुंदर आत्मा मनोहर । मन माझें जालें विव्हळ ॥कैसें०॥१॥
आम्ही स्त्रिया सुंदर स्वधर्मयुक्त । जाउं तरि हंसति सकळ ॥कैसें०॥२॥
कृष्ण स्त्रियांचा अतिलंपट । येणें माझा जिव व्याकुळ ॥कैसें०॥३॥
बाई ! हरि हा आला मंदिरीं । तल्लीन मी झाले केवळ ॥कैसें०॥४॥
राम म्हणे भाग्ववंत नारि । इच्छा पुरवितो घननीळ ॥कैसें०॥५॥

पद ११० वें.

शिवहर सांवा ! उमावरा ! नीलकंठा ! मनोहरा ! ॥ध्रुवपद.॥
भस्म सर्वांगी लेपन । चर्माबर आसन ॥शिव०॥१॥
मस्तकि गंगा विराजमान । गळांनागेंदुभूषण ॥शिव०॥२॥
श्रोत्री कुंडलें रत्नजडित । त्रिशुळडमरू आयुधयुक्त ॥शिव०॥३॥
श्वेत अतिरुचिर वसन । भाळी इंदुधवळ पूर्ण ॥शिव०॥४॥
कैलासशिखरें गम्यस्थान । नंदी असे वहन ॥शिव०॥५॥
वामांकीं गिरिजा सुंदर । त्रिनयन कर्पूरगौर ॥शिव०॥६॥
देवा ! तुला अनेक भत भजती ! ते भवाब्धीते तरती ॥शिव०॥७॥
राम म्हणे चरणी अनन्य । सांवा कृपा करी परिपूर्ण ॥शिव०॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP