मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
गोविंदकृत पदें २०८ ते २११

गोविंदकृत पदें २०८ ते २११

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद २०८ वे.

कीर्तनी येई रे ! अतिसदया । श्रीगुरु नरहरिराया !॥ध्रुवपद.॥
कृपाद्दष्टिनें पाहीं मला । सच्चिद्रूपा अमला ।
कमला सेवितसे पदकमला । ठेवुनियां हत्कमला ।
कमलोद्भवजनक ये हृदया ॥श्रीगुरु०॥१॥
दुस्तर भवसिंधूच्या जीवनी । बुडतों येईं निदानीं ।
करुणा कर पाणी, मज धरुनी । नेई परात्परसदनीं ।
निशिदिनीं आठवितों तव पाया ॥श्रीगुरु०॥२॥
बाळक मी तूझा मंदमती । दे चित्सुखविश्रांती ।
निगमागम गाती गुणकीती । म्हणउनि मति दे स्फूर्ति ।
दीन गोविंद तुझ्या घरी पाया ॥श्रीगुरु०॥३॥

पद २०९ वें.

मिरचे व्यंकटभूप मनोरथी. ॥ध्रुवपद.॥
सच्चिसुखाआनंदपरात्पर अनुपम तें स्वरूप ।
तो भक्तास्तव शेषगिरिवरी दाखवितो गुणरुप ॥मिरवे०॥१॥
ज्याचें पद क्षीरसागरदुहिता सेवितसे सुखरूप ।
ते कमलास्थिति विसरुनि जाली पाहे दिव्यस्वरूप ॥मिरवे०॥२॥
प्रर्‍हादास्तव प्रगटुनि स्तंभीं केला दितिज कुरुप ।
तो देशिक गोविंद दीनाचा दावी विश्वरूप ।मिरवे०॥३॥

पद २१० वें.

राधाप्रियमानसहंसा गुणसमुद्रा ।
गोपीजनचित्तचकोरविकसितचंद्र ! ॥ध्रुवपद.॥
मी हीनदीन पदी लीन शीण करीं परता ।
कनवालुपणें दे क्षेम हरी ! ए आर्ता ।
मी दास तुझा तूं सांग सख्या सुखवार्ता ।
हे भवशमना विश्वोद्भवपालनकर्ता ।
जगदाकार जगदीशा प्रतापरुद्रा ॥गोपी०॥१॥
पतितोद्धारा पद्माक्षीरमणा येईं ।
हे मनोवृत्ति अर्पण केल तव पायीं ।
किति अंत पाहशिल माझा कृष्णाबाई ।
भवसरित्पुरीं बुडतों काढीं त्वरें लवलाहीं ।
शिरीं अभयवरद कर ठेवीं, स्थापी मुद्रा ॥गोपी०॥२॥
श्रीमत्सद्नुरुमहाराज नरोत्तम राया ।
दुस्तर भ्रमरूपीं सर्व निवारीं माया ।
क्षण लव पल न गमे तुजवांचुनि यदुराया ! ।
गोवंदमनोरथ पूर्ण करावा सदया ।
मज बसवी तूं साम्राज्यपटाच्या भद्रा ॥गोपी०॥३॥

पद २११ वें.

दीनरक्षका ! पाव तूं तरी ।
हे रमाधवा ! नवाज काज हें असाध्य आज धांव लौकरी ॥ध्रुवपद.॥
लागलें मना विषयसुखपिसें ।
स्त्रीकलत्रपुत्रभ्रातृमित्र हे विचित्र आप्त प्रिय मला दिसे ।
दुष्कृते तई फावले तसे ।
कर्म तें अकर्म थोर फार घोर रूप म्यां केले भलतिसें ।
बुडतों अशा भवसरिपुरीं ॥ हे रमाधवा० ॥१॥
तव वियोग हा सोसेना मला ।
कां व्रजांत गोपीनिवास फाग खेळतोसि सांग कोमला ।
कां उपेक्षिसी  दयाघना ! मनास आणि हे त्यजुं नको मला ।
प्रगट होइं  तूं ह्रदयमंदिरीं ॥ हे रगाधवा०॥२॥
सुंदरानना प्रभु इंदिरावरा ! ।
मंदारोद्धरा ! त्वरा करा हरा अघासि स्वामिभक्तिप्रियकरा ! ।
दीन मी तुम्हां विनविं श्रीधरा ! ।
त्यागितां जलास मीन शीण पावतो तसा मि गूणगंभिरा ।
द्वय पदांबुजी ठेविं रे हरी !  ॥ हे रमाधवा०॥३॥
क्षणक्षणां असे जीव घाबरा ।
रुक्मिणीनिवासका ! निका विचार मांडिलासि भुवनसुंदरा ! ।
गुरु नरोत्तमा ! अभयसुखकरा ! ।
आस पुरविं दास गोविंदास पदविलास देउनि पाश दूर करा ।
श्रीनिकेतना पोठिसी घरी ॥ हे रमाधवा०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP