रामकविकृत पदें ११५ ते ११८
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ११५. वें.
अहे धन्य धन्य प्रेमभावे मी । कृष्णाविण न जाणें अन्य मी ।
म्हणोनि जालों जगीं मान्य मी । नेणो आचरलों कोण भक्तिसी ॥ध्रुवपद.॥
नैनांपुढें देव देखिल्ला । तेणें द्दश्यभाव संपला ।
सर्वभूती गोपाळ दाटला । आतां भवसिंधु सर्व आटला ॥अहो०॥१॥
हृदयी हरिचे चरण धरिले । तेणे मीपण सर्व नासिलें ।
ब्रम्हानंदें सुख व्यापिलें । आतां जन्ममरण काय बापुडें ॥अहो०॥२॥
आतां शरण कोणसि जाईना । निजरूपी लक्ष सोडीना ।
अहंममता स्मर स्मरेना । आतां भ्रमाचें द्वय असेना ॥अहो०॥३॥
तिहीं लोकीं देव पाहिन । हाचि भक्तिभाव करिन ।
अलक्ष लक्षी लक्ष ठेविन । अच्युतचरणी राम शरण ॥अहो०॥४॥
पद ११६ वें.
साधुसंगे भतिरंगें स्मरण करावें.
कीर्तनछंदें रामासंनिध प्रेमें डोलावें ॥ध्रुवपद.॥
अध्यात्मचरित्र परम पवित्र हरिचें वर्णावें ।
मननेंकरुनि बोध भावें चित्तीं धरावे ॥साधु०॥१॥
वैराग्यभक्ति ज्ञान करुनि अंतरी ठेवाव्या ॥साधु०॥२॥
जेणेंकडुन हृदयी स्मृति व्हावी कृष्णाची ।
ऐसी कीर्तनशक्ति आहे साधूचे घरची ॥साधु०॥३॥
अखंडित भजनें निजरूपस्मरणें वजवि हो टाळी ।
अच्युतरचरणी राम निर्भय जाला त्रैकाळीं ॥साधु०॥४॥
पद ११७ वें.
मज नाहीं प्रीति अनेक आकारीं ॥ध्रुवपद.॥
तीन्हि लोक अहंस्फूर्ति ब्रम्ही हे विलया जाति ।
वाचा श्रुतिस्मृति मौनावल्या ॥मज०॥१॥
दिव्य चक्षु कृष्णांजन देव दिसे एकपणें ।
महाराज अवघा पांडुरंग ॥मज०॥२॥
‘तत्त्वमसि’ महावाक्य विसरूनियां क्षराक्षर ।
बोधे मथुनियां सार एक आत्मा ॥मज०॥३॥
अवघा हरि प्रकाशला द्वैतभाव सर्व गेला ।
गुरुचरणी लीन राम जाला ॥मज०॥४॥
पद ११८ वें.
निजस्मृति निशिदिनि हृदयीं स्मरत जावें ॥ध्रुवपद.॥
अहंभाव देहधर्म द्दगद्दश्य सर्व रे ! ।
त्यजुनि गोपाळ मनीं ध्यात जा रे ! ॥निज०॥१॥
निरहंकृति कर्म करूनि निष्कर्मीं वर्त रे !
येणें जन्ममरणताप तुझे चुकति रे ! ।
सर्वभूतीं देवपाहें हाचि भक्तिभाव रे ! ।
प्रेमभावें श्रीहरितें गात जा रे ! ॥निज०॥२॥
सर्वभूतीं देव पाहें हाचि भक्तिभाव रे ! ।
पेमभावें श्रीहरितें गात जा रे ! ॥निज०॥३॥
राम म्हणे शरण आलों तव स्मृति देईं रे ! ।
पूर्णकृपें मज दीनातें उद्धरीं रे ! ॥निज०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP