चिन्मयनंदनकृत पदें १७५ ते १७७
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १७५ वें.
श्रीराम म्यां परिणिला ग ! । रघुविर म्यां परिणिला गं ! ॥
याविरहित भूपाल सख्यांनो ! जनकासम ते मला. ॥ध्रुवपद.॥
रघुविर कोमळतनू ।
परम कठिण हें कमठपृष्ठिसम कठोर हें शिवधनू ॥
किशोर हा सुखधनू ।
अतिकोमळ नवपल्लवसम हें; करकमळें लाहनू ॥
चाल ॥ मुखकमळाची शोभा ।
पूर्णशशिसम प्रभा ।
सुनिळ नभींचा गाभा ।
ॠषिधनवर हा उभा ॥
टीप ॥
ठाणमाण लघु शरधनु विलसे, मम हृदयीं बैसला. ॥श्रीरा० ॥१॥
तळमळ बहु लागली ।
झर् झर्र झर्र झर्र झर्र झर्र नयनीं अश्रुधार चालली ॥
सद्गद अंतरीं झाली ।
थर थर थर गात्र कांपती, धरणीवर पडली ॥
चाल ॥
सकळ सख्या धांवती ।
एक सावध बसविती ।
एक विंझणा जाणविती ।
एक मधुर वचनें बोधिती ॥
टीप ॥
काय काय सखे ! सावध कां हो ! अतिशय कां मांडिला ॥श्रीरा० ॥२॥
सखयांनो ! तुम्ही जा जा ।
मम जनकातें सांगा जाउनि झडकरि वृत्तांत माझा ॥
म्यां वरिला रामराजा ।
निश्र्चय हा दृढ अंतरी माझ्या, त्याचिच मी प्रिय भाजा ॥
चाल ॥
सांडि सांडि सांडि हा पण ।
अति कठिण शिवधनु जाण ।
त्यासि चढविल कैसा गुण? ।
मी त्यजीन आपुला प्राण ॥
टीप ॥
हें मानस दृढ समजुनि द्यावें अभय सख्यांनो ! मला ॥ श्रीरा० ॥३॥
जय जय श्रीत्रिपुरारी ! ।
तव कार्मुक हें हळुवट व्हावें कृपायुक्त अंतरीं ॥
त्वां आपुले निजकरीं ।
निरवावें मज करुणाभरिते श्रीरामाचे करीं ॥
चाल ॥
हर ! हर ! पार्वतीधवा !।
योगविधि वैभवा ! ॥
सांबसदाशिव भवा !
गोविंदीं निजठेवा ॥
टीप ॥ ऐकुनियां हे करुणा अंतरि प्रेमभरें दाटला ॥ श्रीरा० ॥४॥
पद १७६ वें
कृष्णा ! सकुमारा ! नंदकुमारा ! । दधिनवनितचोरा ! ॥ध्रुवपद.॥
शरणागतवत्सल हें ब्रिद पायीं । जाणुनियां हृदयीं ॥
आलों शरण मी तुला लवलाहीं । दिनजनसुखदायी ! ॥
बुडतों दुस्तर गांगप्रवाहीं । आढीं चहुंबाहीं ॥ कृष्णा० ॥१॥
स्मरतां गज तांतडिनें उद्धारिला । गोवर्धन धरिला ॥
इंद्रें छळितां वांचविलें पुरिला । मद त्याचा हरिला ॥
गरळा मुखि धरितां दुर्धर अहिला । पदघातें चुरिला ॥ कृष्णा० ॥२॥
नाहीं हें संकट तुजला भारी । मज दीना तारीं ॥
अससी निजभक्तसखा कैवारी । मम दृष्कृत हारीं ॥
वैरी षड्रिपु हे दुस्तर वारीं । सज्जनसुखकारी ! ॥ कृष्णा० ॥४॥
पद १७७ वें
हरिविण झालें मी बहु दीन दीन ॥ध्रुवपद.॥
काय करूं किति धीर धरूं । गुण कैसे विसरूं त्याचे ।
तळमळ माझी कवणा सांगूं । जळविरहें जसा मीन मीन ॥ हरी० ॥१॥
क्षण न गमे, युग साच गमे । न कांहीं चित्त रमे माझें ।
गोविंदप्रभु जरी मज भेटे । तरी हा देह ओंवाळीन. हरी० ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP