उभी शृंगार करुन पिवळा ।
उठा चला मंदिरी लुटा रंग बहार नुतन पिवळा ॥धृ०॥
सख्या सजवुन पिवळी घोडी ।
कुठे जाता प्रियकरा कुणाची लागली हो गोडी ॥
ठेऊन जिन पिवळी गेंद जोडी ।
मुखपट्टा पिवळा कलगीवर लाउन अती आवडी ॥
पिवळ्या चुटिया नागमोडी ।
चाले ठुमकत ती मादवान उडे पिवळी फुलोडी ॥चाल॥
अरे सख्या तू मम गळींचा पिवळा हार ॥
अरे सख्यारे लूट घरी हा पिवळा बहार ॥
अरे सख्यारे कोण मिळाली पिवळी नार ॥
खराबा होईल किरे सगळा ॥१॥
घरी पिवळा दिवाणखाना ।
पिवळ्या पलंगावर करविला पिवळा बिछोना ॥
फाणसे पिवळी हलक्यांना ।
आत पिवळ्या मोंबत्त्या आरसे पिवळे झरूक्यांना ॥
शुद्ध पोपट पिवळे नाना ।
रंग दिल्हा पिवळा सारउन चौफेर छतांना ॥चाल॥
अरे सख्यारे तू पिवळे चंपक फूल ॥
अरे सख्यारे मी नार पिंवळी मखमूल ॥
अरे सख्यारे करी पिवळी कळी दुलदूल ॥
गुलगुलित असी नादर विरळा ॥२॥
पितांबर पिवळा जरी काठी । आधी नेसुन पिवळ्या हाते वाढिन सुवर्ण ताटी ॥
बसावे तुम्ही पिवळ्या पाटी । लावीन पिवळे गंध सुरेखुन तुमच्या ललाटी ॥
तुरा खोविन पिवळ्या मुगटी । खंडेराव तुम्ही झाले म्हाळसा पिवळी मी तुजसाठी ॥चाल॥
अरे सख्यारे लाव भाळी पिवळा भंडार ॥ अहो सख्या त्या पिवळा झगा छडिदार ॥
अरे सख्यारे हा मदन मज अनिवार ॥ ज्यार फार करी किरळा ॥३॥
पांघरून पिवळी शाल खाशी । हाती घ्या पिवळी छडी बसुन पलंगावर विलासी ॥
चुरिन पिवळ्या करे पायांसी । बुटेदार चोळी तंग तटाटित पिवळी सुवासी ॥
आनंदे पिवळ्या शेजेसी । पिवळ्या कवळ्या छेल छबेल्या बसेज तुजपाशी ॥चाल॥
अरे सख्यारे गाई गंगु हैबती नवे ख्याल ॥ अरे सख्यारे घडीभर तरी ऐकुन व्याल ॥
अरे सख्यारे कधी करशिल महादेव न्यहाल ॥ तडाखा कली वर अगळा ।
गुणीराज म्हणे प्रभाकरला लाव तुरा पिवळा ॥४॥