किती रे धीर धरू मी यावरी ।
चाल उठ सख्या मंदिरी ॥ध्रु०॥
प्राणप्रिय तू एकांतिचा ।
जिवाचा जिव विश्रांतिचा ॥
लुटुन रस कस घे नवतिचा ।
डौल पहा माझ्या छातिचा ॥
उजेड पडे गोर्या कांतिचा ।
का पडदा पडला भ्रांतिचा ॥चाल॥
अशी रे अपराधी काय तरी ॥१॥
प्रीत पहिल्यापुन लावली ।
आशा रे गोड बोलुन दावली ॥
सवत कोण दुसरी घावली ।
नजर तिजवरती धावली ॥
न घेसी माझी सावली ।
जासि तिथे अपुल्या पावली ॥चाल॥
मागे तळमळते मी घरी ॥२॥
शरीर तुजकरिता जाळिते ।
लाड नित नवा खोपाळिते ॥
रुसुन बसल्या धुंडाळिते ।
कठिण मर्जी सांभाळिते ॥
वेळ रागाची टाळिते ।
धरुन मग बळे कवटाळिते ॥चाल॥
तुझ्या रे प्रीतीची सुंदरी ॥३॥
बोलले गंगु हैबती ।
पलंगी दोघे शोभती ॥
झडती नावाच्या नौबती ।
डफावर बिरदे लोंबती ॥
महादेव गुणिराज सोबती ।
छंद किती ऐकुन थांबती ॥चाल॥
प्रभाकर कवनी रस भरी ॥४॥