नका जाउ दूर देशी घरीकाय धनद्रव्याला कमी ।
आलि हो वर्षाची नागपंचमी ॥धृ०॥
झिर मिर झिर मिर पर्जन्य वरसे भर महिना श्रावण ।
कठिण लष्करची हवा दारुण ॥
महोत्सव नगरात मिळाले देशावरिल ब्राह्मण ।
पाहू सुख सोहळा दोघेजण ॥
नका जाऊ टाकुन करा घरी नागपंचमी सण ।
किती तिन आठवून तुमचे गुण ॥चाल॥
रहाण्याचा निश्चय करा हो ।
तुम्ही राजहंस पाखरा ॥
नवनिध गौरिशंकरा हो ।
मम प्राणसख्या प्रियकरा ॥
सर्वातस्वरुपसुंदर हो ।
निष्कपट सगुणमंदिरा ॥चाल॥
पसरिते केव्हाची पदर ॥
काही पोक्त करा तरी नदर ॥
दूर जाणे न सोसे सदर ॥चाल॥
आदरे करुन विनविता कदर का कठिण करिता तुम्ही ॥१॥
लिहुन भिंतीवर भुजंग भरिला रंग चितार्याकडून ।
सडे घालविते द्वारापुढून । रत्नजडित श्रृंगार करीन मी अतिआदरे आवडून ।
बसा न्हाउन या सरसे भिडून ॥
पुजन करून जोद्याने यथाविधि शास्त्रमार्ग निवडून ।
नका करू जलदी एवढी अडून ॥चाल॥
उतरा जिन घोड्यावरिल हो ।
दुर वेध दुरावा दुरील ॥
कोण दुःख श्रमाचे हरिल हो ।
कोण धाऊन ह्रदयी धरील ॥
कोण शेज फुलांची करिल हो ।
कोण चरण तुमचे चुरील ॥चाल॥
मुळी मुलुख कर्नाटक ॥
निर्दई लोक कंटक ॥
विश्वासघातकी ठक ॥चाल॥
बिकट झाडी चहूंकडून बार्या कठिण निर्जल भूमी ॥२॥
साजुक नाजुक पदार्थ केले शर्करेत भरभरून ।
पाक पाजिवला सगळ्यांवरून ॥
तळुन मळुन बोटवे वळुन वाढीन पदर सावरून ।
चंद्र न्यहाळिन मी तुमचा दुरून ॥
मर्जिस पडल्या मला पुढे घ्या भोजनास प्रीति करून ।
घास घाला हो जोबन धरून ॥चाल॥
नाही फार दिवस अवधी हो।
एक दिवस उद्यांचा मधी ॥
गेल्यावर याल कधि हो ।
ते समजुन सांगा अधी ॥
खडिसाखर मिसळे दुधी हो ।
तशी प्रीत तुझी गुणनिधी ॥चाल॥
वर खाली पाहुन वागते ॥
हितगुज जहाले सांगत ॥
घडोघडी चरणी लागते ॥चाल॥
नका करून कुच हेच मागते राहा आपल्या आश्रमी ॥३॥
परोपरी विनवून एकांती माघारा फिरविला ।
नेऊन सुखशयनी सगुण मिरविला ॥
हवा तसा सण पंचमिचा घरी पतीपासुन करविला ।
ह्रदयी कवटाळुनि श्रम हरविला ॥
पुढे दिपबाळी करून बेत मग जाण्याचा ठरविला ।
सकळ सुखसोहळा असा पुरविला ॥चाल॥
करी गंगु हैबती कवन हो ।
गवसून सारखी गवन ॥
ठेवी कडोविकडिची ठिवण हो ।
अक्षरी मोत्यांची ववण ॥
लय लाऊन करिती श्रवण हो ।
जणू मिष्टान्नाचे जेवण ॥चाल॥
महादेव कवीश्वर म्हणे ॥
विद्येचे माहेर पुणे ॥
काय गुणी राजाला उणे ॥चाल॥
पदरचना नित प्रभाकराची सभेस गाइन मी ॥४॥