सगुण सुपात्रा कारे रुसलासी ।
त्यजुन बिछोना दूर बैसलासी ॥ध्रु०॥
काय चुक घडली सांगा निवाडा करुन ।
नाहाक छळावे अबोला धरुनी ॥
घडोघडी एव्हढी तुमच्या मरणी मरुनी ।
अखेर मी अपेशी सदा झुरझुरुनी ॥
परोपरी आर्जव करिता पहाना ठरुनी ।
म्हणुन अचंबा वाटे फिरुनी ॥चाल॥
अनेक शशिला चहातात तारे ॥
परि ते अमान्य सिंधुतारे ॥
तशापरि स्तविता तुजला, न येसी हातारे ॥चाल॥
वृथा का असा जीवी त्रासलासी ॥१॥
जिवाहून अतिशय चहातो मयूर घनासी ।
तरी तो न सोडी जीवन दिनासी ॥
कुरंगिचे संकट पडले सीतळ वनासी ।
नवल नव्हे हे पुसावे मनासी ॥
अवकृपा करुनी अंगे समुद्रे लिनासी ।
उगीच त्यजावे सख्या का मीनासी ॥चाल॥
क्षुधातुन पांथिक लक्षी सुफळ बनाला ॥
अकिंचन शरण निघतो नरवाहनाला ॥
पतिव्रता शिरसा वंदी भ्रतारधनाला ॥चाल॥
अनंदत जाला फिदा दिल खुलासी ॥२॥
मनी तुझी ठसली काया निरोगी सुखाची ।
कुणी रे करीना सर या नखाची ॥
अलाबला घेता तिंदा सजेल्या मुखाची ।
परत होतेरे वियोग दुःखाची ॥
न भेटता घडका जाते केवळ विखाची ।
कट्यार जिव्हारी जशी काय शिखाची ॥चाल॥
प्रियकर सगळ्या झाल्या कशा पारख्या रे ।
तरी त्यान होती मजसारख्या रे ॥
वरवर दिसती गोर्या भुरक्या रे ॥चाल॥
तयांना सख्या रे बरा भूललासी ॥३॥
तुझ्या स्नेहाचा रे मजला प्रपंची विसावा ।
एक विचार उभयता असावा ॥
खुशालित शयनी पलंगी पडदा नसावा ।
अवीट प्रीतिचा जिव्हाळा दिसावा ॥
परस्पर येता जाता वृत्तांत पुसावा ।
विकल्प विरुनी सुकल्प ठसावा ॥चाल॥
बूट गंगु हैबतीचे रशेले रिझाऊ ।
निवडक अक्षर अर्थी बहुत सजाऊ ॥
महादेव गुणिजन गाती पसंत धजाऊ ॥चाल॥
प्रभाकर कविचे कवन विलासी ॥४॥