मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
स्वभाव तुमचा उतावळा । दा...

लावणी - स्वभाव तुमचा उतावळा । दा...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


स्वभाव तुमचा उतावळा ।

दाटी पुढील दारी मागिल दारी आहे कोठिमधे कोठवळा ॥ध्रु०॥

सहज तुम्हांला पहाता दुरून ।

दोन्ही जिने उतरून धावते लगबग लगबग माडिवरून ॥

बसाल कोठे कुच धरून ।

निवांत जागा एकांताजोगी नाहि दिसत पाहिले फिरून ॥

व्यर्थ खुशामत आता करुन ।

वर दिसते टवटवीत परंतु अशक्त झाले मुळिच झुरून ॥चाल॥

संकट केवढ ओढवले ।

कोणी मन हिकडील काढवले ॥

दुधात जसे विष वाढवले ॥चाल॥

तसेच घडले त्यात गृहांतरी पुरून उरला गोतवळा ॥१॥

क्षणभर आज मारु द्या मिठी ।

पदरा आड मुख करा जराभर सोडित पडदा उठून छिटी ॥

उगीच नका करू पायपिटी ।

उद्या मी आपल्या पोरोबराबर लिहुन पाठविन हळुच चिठी ॥

सरळ स्नेहामधे पडलि खिटी ।

कसुन कसुन भोगिलेत त्याची ह्रदयांतरी बसली मिठी ॥चाल॥

तुम्ही तर माझे खिलावणे ।

विषयसुखाचे झुलावणे ॥

म्हनुन धाडिते बलावणे ॥चाल॥

कुचकंदुक झेलावणे लागतो गोड हाताचा हातवळा ॥२॥

आपण उभयता पराइत ।

बाळपणापासुन एकाहुन एक चतुर खुब सराइत ।

जमीन होती जिराइत ॥

तीत धान्य पेराचे हो टाकुन पेरिलेत आत चिराइत ॥

असो उद्या जाऊ आमराइत ।

तेथे ही डाव जर न साधे तरी जाऊ पर्वतिच्या वनचराइत ॥चाल॥

रतिपति मजप्रती आवरेना ।

पदर घडोघडी सावरेना ॥

कसे मन सांगा बावरेना ॥चाल॥

हौस पुरेना धीर निघेना धरुन बळकट मज आवळा ॥३॥

शरीर कोरे करकरित ।

गाल गुलगुलित अधर तुळतुळित सुढाळ नासिक धरधरित ॥

जेव्हा तेव्हा नथ थरथरित ।

भवय कमाना आकर्ण मारू विशाळ लोचन गरगरित ॥

उभार छाती तरतरित ।

सुरुप गुणाने अशी जी कांता ती पाणी करते झरझरित ॥चाल॥

प्रसन्नवदना क्षमा करी ।

शरणागत जोडल्याकरी ।

गंग हैबती कवित करी ॥

महादेव गुणी जाणे प्रभाकर एकमेकाला करी कवळा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP