जेव्हा होते चेतना तेव्हा स्तन दोन्ही चुरते ।
घडोघडी जरी दाबुन धरते ॥ध्रु०॥
मदन पारदापरि सदा देहात डळमळतो ।
कसा तरी रिपू फारच छळतो ॥
दुःख मनातिल सांगु कुणा यास्तव जिव जळतो ।
स्नेही कुठे तू सारिखा मिळतो ॥
किती मिठि मारू कंठी अता समय सख्या टळतो ।
तुझा तुज सर्व विषय कळतो ॥चाल॥
ऊठ चल पलंगावरता ।
कर इष्क रतुन पुरता ॥
जिव जातो रे चुरमुरता ॥चाल॥
म्हणुन खुषामत पुढे पुढे केव्हाचिरे करते ॥१॥
नरम नार नागवेल मी सर्वांगी कवळी ।
पहा तरी नुतन नवी नवळी ॥
पातळ पुतळी फोक तनु शेंग सडक चवळी ॥
रंग लव थवित सदा पिवळी ॥
कुच कवटाळुन बैस सख्या क्षणभरी मजजवळी ।
कोण नित असे सोशिल टवळी ॥चाल॥
किती राजी फुकट तुजला ।
कोण सुख दाविल मजला ॥
आसा कुठे ईश्वर पुजला ॥चाल॥
आला दिवस झिजवुन हेह तव मरणीमरते ॥२॥
मर्जिप्रमाणे सगुण गुणे योग्य रूपे असते ।
तरी का संग करून फसते ॥
मन मानेल तेव्हा घेउन कुठे स्वस्थपणे बसते ।
अता धर्माची उघड दिसते ॥
शेवट कसा करशिल पुढे हेच खचित पुसते ।
सांग म्हणुन तिनतिनदा रुसते ॥चाल॥
तू प्रियकर आवडता ।
मज नाहिस नावडता ॥
जरी मुळीच सापडता ॥चाल॥
तरी पहिला फिरवुन पती तुलाच मी वरते ॥३॥
रात्रंदिस विश्रांत जिवा जेव्हा दृष्टिने पहाते ।
तेव्हा रे तुज निजमंदिरी बहाते ॥
करुन सर्व श्रृंगार सुखे सन्मुख उभी रहाते ।
असी रे निष्कपटपणे चहाते ॥
आवड तुला त्या गोष्टि सदा ह्रदयांतरी वहाते ।
मीच म्हणुन दुःख असे सहाते ॥चाल॥
हकनाहक मसी रुससी ।
किती लपुन छपुन सख्या बससी ॥
गुज गोष्टी दुरुन पुससी ॥चाल॥
कामातुर मी होउन असी पहा भवती फिरते ॥४॥
सुगंध शीतल अमोलिक तरु मैलागर तू ।
केवळ उपकाराचे नगर तू ॥
क्षमा आणिक शांतीचा दुजा अथाक सागर तू ।
सबळ स्वरुपाचा रे आगर तू ॥
रति काळी पावते सुख असा पुरुष सुगर तू ।
चतुर पारख सौदागर तू ॥चाल॥
गंगु हैबती मती पसरी ।
करी कवन कळा कुसरि ॥
महादेव लुंगे घसरी ।
प्रभाकराचे सगुण मनी स्मरुन सदा झुरते ॥
घडोघडी निरी दाबुन धरते ॥५॥