मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
पसरित्ये पदर महाराज एकांत...

लावणी - पसरित्ये पदर महाराज एकांत...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


पसरित्ये पदर महाराज एकांती चला ।

जिव जातो विषयाने गांजिले मला ॥धृ०॥

तुम्ही सर्वगुणसंपन्न प्राणप्रियकरा ।

काही माझी किंचित तरी माया करा ॥

छळू नये असे कुळवंताच्या लेकरा ।

आवडेना बोलणे शब्द शर्करा ॥चाल॥

जन्माची अक्षयी झाले संगतिण ।

दोहो घरची मी माषुक श्रीमंतिण ॥

नव्हे गरजी कोण कसबिण कळवंतिण ॥चाल॥

आज उदास मर्जी कशावरून ही जाहली ।

जिवलगा उठा ह्या समयी चला रंग महाली ॥

घडोघडी देहामध्ये विषयबाण करि कहाली ॥चाल॥

झाली रात्र गजर दोन प्रहरचा वाजला ।

शनि चंद्र मंगळ माथ्यावर आला ॥१॥

ह्या विषयसुखाचे स्वामी आपण जिवलगा ।

किती सांगू उघडून आवडत्या नगा ॥

मुखचंद्र गेंद टवटवित माझे बघा ।

मिठी मारा सळसळती सार्‍या रगा ॥चाल॥

मऊ मांड्या कंबर सिंहासारखी ।

तुम्ही त्यात अत्यंत विषयपारखी ।

भर ज्वानी हा विस्तव जणु रखरखी ॥चाल॥

पुढे वंशवृद्धी करण्यास्तव कंबर बांधा ।

पाचवा दिवस घात सुमुहुर्त साधा ॥

रत झाल्या उभयता उतरेल उत्तम रांधा ॥चाल॥

वेधले चित्त हकनाक उशिर लावला ।

सुख भोगा मनोरथ पुरवा चांगला ॥२॥

नवी तरणी नार मी तरुणदशेमधी तुम्ही ।

घरी नाही धन संपत्तिल काही कमी ॥

थोरांनी असे दुर्बलास करु नये श्रमी ।

लग्नात पाटावर दिली हमी ॥चाल॥

मग अता हयगय का मांडली ।

अपराधावाचुन माया सांडली ॥

हरणिला अडचणीत कशी कोंडली ॥चाल॥

लटपटित कासोटा सैल झाली पहा निरी ।

पटपटा पाई डोइ ठेविता पुसली चिरी ॥

कोठे बाळी उडाली घाईत कोथिंबिई ॥चाल॥

विखुरला भांग सर्वांगी घाम दाटला ।

अरे देवा किती जिव आपला आटला ॥३॥

अहो उठा सख्या बेलाशक मजवर तुटा ।

आधी दाबा एक एक बळकट बाहुटा ॥

सुखात करा मग रंग प्रहरभर लुटा ।

मी सुटल्यावर कळेल तेव्हा तुम्ही सुटा ॥चाल॥

मुख माझे कुरवाळा कुळभूषणा ।

सकुमारा हे प्रिय अमृत भाषणा ॥

बहुतांच्या लालन पालन पोषणा ॥चाल॥

कवि गंगु हैबती शाहिर नामांकित ।

करतात कवन गातात मधुर नोकित ॥

महादेव गुणिजन प्रभुचे आज्ञांकित ॥चाल॥

म्हणे पंत प्रभाकर समय निघुन चालला ।

आम्ही जातो तुम्ही इष्क करा आपुला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP