नका बसू रुसुन पदर पसरिते स्वरुपसुंदर हो ॥
नागपंचमी सण सोहोळ्याचा चला राजमंदिरा हो ॥धृ०॥
पवित्र प्रियकर मित्र तु माझा अरे जन्मोजन्मींचा ।
सदयह्रदय सर्वज्ञ भाससी धनाढ्य सुखधामींचा ॥
स्वकर्मात नितलक्ष दक्ष सावध प्रपंचकामींचा ।
असे असुन कवण समय हा सुरतसंग्रामीचा ॥
जरी बादली चौफेर पडदे मधे मंचक स्वामींचा ।
पाहुन सुना तिळपाप होतो आज अंतरयामींचा ॥
अंकावर घ्या तरी हरी बरी मज ऐसी इंदिरा ॥१॥
शिळंधार पर्जन्य झडीचा थंड सुटला गारवा ।
उठा उठा वर चला म्हणुन जणू फिरे भवता पारवा ॥
सन्मुख मज बसवून विनोदे हार मारुन गौरवा ।
लाल कुसुंबी तंग कंचुकिला विलासला दोरवा ॥
पल्लेदार पोषाग करुन आज पैठणचा हिरवा ।
छत्रपतीसारिखे विलासे निज मंदिरी मिरवा ॥
विन्मुख फिरवू नका कृपाळा करुणाकर रणधीरा ॥२॥
अपूर्व आरसेमहाल तूसाठी रमणिक श्रृंगारिला ।
साफ स्वच्छ चादरा कलाबतू घोस हारोहारिला ॥
तर्हेतर्हेची विचित्र चित्रे कंदिल दुमदारिला ।
ज्योति ज्योतिवर मंगळ गाळुन प्रकाशमणि पेरिला ॥
जिकडे तिकडे दाट रुपेरी तळि मुकेस पसरिला ।
इंद्रभुवन चकचकीत सुशोभित काय पहावे बहारिला ॥
गुलाब अत्तर शिंपुन केली तयार सारी धरा ॥३॥
संशय दीप निःसशय समीरे उठून अधि मालवा ।
एक निश्चय दुधी त्यामधी ममता-खडिसाखर कालवा ॥
गुणे गोविंद मला दाहा वेळ पलंगावर पालवा ।
रहस्य पाहुन भोकती कैक स्त्रिया भालवा ॥
गंगु हैबती म्हणे असा स्नेह शेवटवर चालवा ।
महादेवाचे वचन मानुनी सुखात दिस घालवा ॥
गुणिराज गुणकरी प्रभाकर बळकट स्वकरी धरा ॥४॥