सुफल प्रफुल्लित थंडनिबिडतरु बहु बैसले चौसरी ।
बहार घ्या बंगल्यात बसुन ह्य वसंतऋतु अवसरी ॥ध्रु०॥
अपूर्व रमनीक पूर्वि पित्याने बाग दिला आंदणी ।
काहि दिवस करा ख्यालि खुशालित राहुन तिथे नांदणी ॥
इतर स्त्रियासवे रतुन दवडिता रात्र चटक चांदणी ।
रुसुन अबोला धरिन म्हणुन मांडिलित संपादणी ॥
बहुत दिले घेतलेत तरि त्या कमसल कडु शेंदणी ।
रक्त मांस मद भरित सुरुप मी जसी हिरकणी कोंदणी ॥चाल॥
रथ रंगित श्रृंगारुनी ॥ जाऊ स्वकर्म गृही सारुनी ॥
विनविते मी सत्कारुनी ॥चाल॥
निरोगी आपली समसमान ऐन पराई हो ॥
कसुन भोगावी पलंगावर सौख्य सराईहो ॥
उभयता दिधली श्रीहरिने ज्ञान चतुराई हो ॥चाल॥
दृष्टि भरुन करी धरून मला पहा बाग सख्या दोहोसरी ॥१॥
निपाल जागा स्वच्छ सभोवती सपाट पाटांगणे ।
रंग सुरंगित सुरेख सगळी ठाई ठाई चैत्रांगणे ॥
मधुन मधुन किती दाट थाट तरू केळि फुलफुलले गणे ।
क्रिडा करुन सावलित घेती, खबुतर लोटांगणे ॥
भूचंद्र तुम्ही चांदण्या स्त्रिया वर तो चंद्र तारांगणे ।
नानापरि करु विलास वारंवार हेच सांगणे ॥चाल॥
हे अति सुंदर उपवन ॥ केवळ वांछित भुवन ॥
सुखकारक नंदनवन ॥चाल॥
बहुत आवडते जाहाले केवळ अमरासी हो ॥
आनंदे रमती अंगनासहित सुगरासीहो ॥
तसीच अनकुलता आहे सर्व तुम्हा गुणराशी हो ॥चाल॥
शरिरसंपती तरुण तयरित गर्द घटा दूसरी ॥२॥
केळी नारळी बोरी बकुल इरसाल फणस आवळी ।
मोहोर भरित अमराई नूतन पालवली सघन कोवळी ॥
सरळ सोट सुरमाड येकावर येक जिवट झावळी ।
अंगुरखिरण्या द्राक्षिस घड लोंबतात मुंढावळी ॥
लिंब लिंबोणी जांब अनानस बदाम बट सावली ।
अशा हवे मधी भ्रतार भोगिन जलमंदिर रावळी ॥चाल॥
नारंगी सलाट लागल्या ॥ डाळिंबी सुफल चांगल्या ॥
पोफळी पोफळी रंगल्या ॥चाल॥
सिताफळी दुसर्या खारका नविन कोमाच्या हो ॥
गदरल्या वरत्या सर्वांगी पिकट जोमाच्या हो ॥
प्रफुल्लित दिसती आज सकळ कळा सोमाच्या हो ॥चाल॥
सत्यवचन नेमाची त्यात सती सन्निध आपआसरी ॥३॥
जाइ जुई जासोंदी गुलाला गुलाब गुलदावरी ।
सुवर्ण चंपक बकुल मोगरे सुरंगी फुल शेवरी ॥
ईष्क पेंच गुल्छबू सदोदित भर शेवंती सावरी ।
पार्यातक गुलटोप गुलगुलित जळी कमळण वावरी ॥
एकांती गाठुन करते खुशामत नाहि रिझवित वरवरी ।
तुम्ही कृष्ण भगवान तुळस मी पवित्र पायांवरी ॥चाल॥
मोहो वृद्धिंगत स्नेह करा ॥
पहा प्राणसख्या प्रियकरा ॥
अहो उदार शिव शंकरा ॥चाल॥
फवारे उडती कारंजी पुढे रंगाची हो ॥
तरंगती बदके उदकावर कनकांगाची हो ॥
पदर पसरुन मी उभी आशावंत संगाचीहो ॥चाल॥
गंगु हैबती कवन करी संगीन कला कुसरी ।
महादु प्रभाकर म्हणे सखिचा श्रीमंत पती सासरी ॥४॥