नित जपुन बलावू धाडुन ।
बळे अमृत पाजिते पाडुन ।
घ्या रस कस साजुक झाडुन ॥चाल॥
असे आले वाढुन ।
तरी कर काढुन ।
सख्या वल्हांडुन ।
जाऊ नका मन मोडुन ॥ध्रु०॥
रुप संदर नूतन पाहुन ॥
गेले मन्मथीसिंधुत वाहुन ॥
आजवर नीट अनसुट राहुन ॥चाल॥
कसे मन मोहुन ।
घडोघडी केला विषय पलंगावर संशय सोडुन ॥१॥
अर्धी पवित्र पात्र विटाळुन ॥
दूर देशी भ्रतार पिटाळुन ॥
आली अवघड संधी ती टाळुन ॥चाल॥
हळुच हताळुन ।
असे खेळ खेळुन ।
आता उगीच काहो दाखविता स्नेह तोडुन ॥२॥
पहा पहा मनी सर्व विचारुन ॥
नित सात्विक धर्म आचरुन ॥
काय काय तरी दावू उच्चारुन ॥चाल॥
दुध तुप चारुन । देणे घेणे वारुन ।
आखर आपण झिडकारुन धरता ओढुन ॥३॥
तुम्ही माझे तुळसीवृंदावन ॥
सेविता पदांबुज पावन ॥
गुणी गंगु हैबती गावन ॥चाल॥
रसिक कवन करी अक्षर साक्षर महादेव गुणिराज प्रभाकर जोडुन ॥४॥