मी एव्हढी जपत किंहो असता मसी चोरुनी ।
तुम्ही अखेर बहार बाहेर येता हो मारुनी ॥ध्रु०॥
कोपरापसुन कर एकांती नित जोडिते ।
बळे पदर धरुनी मिठि मारुन हात ओढिते ॥
चालता कमर ठुमकत चमकत मोडिते ।
घडोघडी साळुंखीपरी टाहो फोडिते ॥
मंदिरी चला किती जिव अपुला तोडिते ।
संतुष्ट मर्जी राखुन सैल सोडिते ॥चाल॥
कडकडीत उन्हाळा वियोग हा रखरखी ॥
आहे स्वरुप रुपाने तव स्वरुपासारखी ॥
दिड दिसांत करिता कसि प्रियकर पारखी ॥चाल॥
धावुन धरता परकीस अंगिकारुनी ॥१॥
मद अष्ट गुणित जरी स्त्रियास पुरुषाहुनी ।
तरी काळ सुखे कंठितात कळ साहुनी ॥
सहजात कदाचित मन फिरले पाहुनी ।
गुजगोष्टि हसुन बोलतात दुर राहुनी ॥
स्नेह प्रीत जिव्हाळा शब्द ह्र्दयी वाहुनी ।
मर मरुन जाती त्यावरुन जवळ बाहुनी ॥चाल॥
इष्काची हीच तारिफ चतुर जाणिती ॥
सद्भावे कीर्तिकल्याण मुखे वाणिती ॥
रिझवून परस्पर वचनामृती न्हाणिती ॥
आणिती आदरे भोजनास पाचारुनी ॥२॥
घरी त्यजुन अशा अती योग्य कुळाचारणी ।
नव नव्या नूतन धुंडितात बाजारणी ॥
धादांत कपटकर निसंग व्यभिचारणी ।
श्रम व्यर्थ उघड भासतात बिन कारणी ॥
केव्हा अंगसंग साधीन पलंगाच्या रणी ।
फिटतील तेव्हा दोहो डोळ्यांची पारणी ॥चाल॥
आठवुन सगुण तिळतिळ काढीन उटे ते ।
सांगतात खुण तडफडून ह्रदय फुटते ॥
राहू राहुन सख्यारे रडू दारुण सुटते ॥चाल॥
गार थंड होता कुठे गरज सर्व सारुनी ॥३॥
प्रारंभी पित्याने स्थळ सुंदर शोधिले ।
परोपरी बहुल्यावरी वडिलपणे बोधिले ॥
हकनाक अधांत्री मधी अंतर दीधले ।
कसे विषयरसे अगदिच चित्त वेधिले ॥
नाही पूर्वि यथाविधी दैवत आराधिले ॥
म्हणुन कोण्या पोटकर्पिने वैर साधिले ॥चाल॥
कवी गंगु हैबती दक्षणेत शाहिर ।
अक्षरे अमोलिक सुरेख सुजवाहिर ॥
महादेव गुणीजन गुणज्ञ जगजाहिर ।
करी छंद प्रभाकर विशेश विस्तारुनी ॥४॥