उठा उठा हलविते आता पहा पहा पहाट फारच झाली ।
व्हा जाग्रत प्रियकरा कुचाची खरी नौबत वाजुन राहिली ॥धृ०॥
करुन मधा जिनबंदी सख्या पुढे स्वताच बिनिवाले सरले ।
सरंजामि सरकारी एकांडे ठळक ठळक मागे उरले ॥
रव पडली पहा उंट तटे किती सौदागर देशावरले ।
हाका आरोळ्या देति भयंकर मार्ग चुकुन डोंगरी शिरले ॥
कठिण घाट आज म्हणुन मुळी आधी फकीर आणिक ढाले फिरले ।
अजुन आपण निद्रिस्त तशामधी होती मुकाम फारच दुरले ॥चाल॥
पहाटेची झोप अतिगोड केवळ शरकरा ।
उठू नये वाटते खरेच कि हो प्रियकरा ॥
सुखरूप शयन मजलिस गेल्यावर करा ॥चाल॥
सगुण गुण गंभीरा तुला कशी दुपारचि रे सोसेल कहाली ॥१॥
बृहस्पती शशी दैत्यगुरू तिघे तेजहीन तेजी बुडले ।
इतर तारे तर लहान केवळ मग दिसतिल कोणीकडले ॥
श्रीमत प्रभूचे रमणुकीचे तळि बादल डेरे पडले ।
नवे मंडप सजदार गजांवर खांब सहित सारे भिडले ॥
ठाई ठाई तासे तबल तुडुम तिनी तयारिचे मर्फे जडले ।
आरब राहिले सिंदी सोरटी कुलतमाम जन गडबडले ॥चाल॥
आसवले व्याघ्र या वनात वृक हिंडती ।
दिवसास परस्पर मनि निर्भय भांडती ॥
ज्या स्थळी भुते झोटिंग पिठे कांडती ॥चाल॥
अशा गती श्रुत असुन कसे जसे स्वस्थपणे निजला महाली ॥२॥
चपळ पंचकल्याण निळे एक एक सुरेख घोडे दिसती ।
उबार दाण्या साठि हुजुरच्या कुमेदनरमाद्या हिंसती ॥
दुध खिरी शिंगरे पिती सुरु अपेट जेजे वळू असती ।
चार जामेजिन ठेउन अंधारी देउन गडी बळकट कसती ॥
उमेदवारी निवट गोहो काही तयात कुणी ब्राह्मण असती ।
सर्व कर्म सारून अगोदर एव्हापसुन रोखुन बसती ॥चाल॥
जहाले रथारूढ नभात नारायण ॥
लागले काल कडकडीत उत्तरायण ॥
कुठवर तरी करू आर्जव पारायण ॥चाल॥
निबिड अरण्यामधि अशि कशी निचिंतपणची घडी वाहली ॥३॥
दिनदुनयेचे मुगुटमणी राव सुचिन्हमंडित छत्रपती ।
त्यजुन सौख्य सुख शेज यथाविधी सुरेश्वरापरी तप तपती ॥
आप आपल्या गुणे शहाणपणे चारी वर्ण शरीरद्वारा खपती ।
चंद्रदर्शनासाठी सदोदित लक्ष लावुन चातक जपती ॥
स्वहित हिताचे आर्जविते तरी तुम्हांस माझे शर खुपती ।
धर्मस्वरुप साक्षात ज्याच्या स्मरणे करुन संकटे लपती ॥चाल॥
जा जा हो, या हो रायांची भेट घेऊनी ।
कुच करू आपण मग पंचामृती जेउनी ॥
करी कवन गंगु हैबती जीवन ठेउनी ॥चाल॥
महादेव गुणिराज म्हणे ही चतुर सुगर कांता पाहिली ।
प्रभाकरावर मर्जी बहाल दोघांची बहुत जहाली बहाली ॥४॥