केशरोमनखश्मश्रु मलानि बिभृयाद्दतः ।
न धावेदप्सु मज्जेत त्रिकालं स्थण्डिलेशयः ॥३॥
केश म्हणिजे मस्तकींचे । श्मश्रु बोलिजे मुखींचे ।
रोम ते कक्षोपस्थींचे । छेदन यांचें न करावें ॥२०॥
मस्तकीं न करावें वपन । न करावें श्मश्रुकर्म जाण ।
न करावें रोमनखच्छेदन । दंतधावन न करावें ॥२१॥
स्नान मुसलवत् केवळ । अवश्य करावें त्रिकाळ ।
प्रक्षाळावे ना शरीरमळ । व्रत प्रबळ वनस्था ॥२२॥
केवळ भूमीवरी शयन । सदासर्वदा करावें जाण ।
तळीं घालावें ना तृण । मग आस्तरण तें कैंचें ॥२३॥
यापरी वानप्रस्थें जाण । दृढ धरूनि व्रतधारण ।
करावें तपाचरण । तें तपलक्षण अवधारीं ॥२४॥