विविक्तक्षेमशरणो मद्भावविमलाशयः ।
आत्मानं चिन्तयेदेकमभेदेन मया मुनिः ॥२१॥
पवित्र आणि विजन । प्रशस्त आणि एकांतस्थान ।
तेणें माझें अनुसंधान । सद्भावें जाण सर्वदा ॥३१॥
तेथें सांडून जनपद दुश्चित । सदा एकांतीं व्हावें निरत ।
मद्भावें सुनिश्चित । आत्मसुख प्राप्त साधकां ॥३२॥
ज्यासी निजात्मसुख झालें प्राप्त । तो होय अनन्यशरणागत ।
मीवांचूनि जगाआंत । आणीक अर्थ देखे न ॥३३॥
ऐसे अनन्य करितां माझें ध्यान । साधक विसरे मीतूंपण ।
तेव्हां अभेदें चैतन्यघन । मद्रूप जाण तो होय ॥३४॥
त्या मद्रूपाचे स्वरूपस्थिती । पाहों जातां निजात्मवृत्ती ।
मी ना तो ऐशी होय गती । `अभेदप्राप्ती' या नांव ॥३५॥
जंव असे द्वैतवार्ता । तंव भयाची बाधकता ।
अभेदत्व आल्या हाता । निर्भयता साधकां ॥३६॥
अभेदप्राप्तीच्या ठायीं । बंधमोक्षांची वार्ता नाही ।
गडगर्जे बंधमोक्ष पाहीं । नांदती नवायी हरि बोले ॥३७॥