ज्ञाननिष्ठो विरक्तो व मद्भक्तो वाऽनपेक्षकः ।
सलिङ्गानाश्रमांस्त्यक्त्वा चरेदविधिगोचरः ॥२८॥
विषयांची नावडे मातु । ज्ञानप्राप्तीलागीं उद्यतु ।
यापरी जो अतिविरक्तु । तो संन्यास बोलिजेतु मुख्यत्वें ॥८८॥
जो ज्ञाननिष्ठा अतिसंपन्न । सदा स्वरूपीं रंगलें मन ।
कदा न मोडे अनुसंधान । परमहंसासमान हा हंस ॥८९॥
ज्यासी करितां भगवद्भक्ती । अपेक्षामात्राची झाली शांती ।
मोक्षापेक्षा नुपजे चित्तीं । हे संन्यासपद्धती अतिश्रेष्ठ ॥१९०॥
ज्ञाननिष्ठ कां मद्भक्त । इहीं आश्रमधर्म दंडादियुक्त ।
त्याग करावा हृदयीं समस्त । बाह्य लोकरक्षणार्थं राखावे ॥९१॥
येचि अर्थींचें निरूपण । पुढें सांगेल श्रीकृष्ण ।
प्रस्तुत त्यागाचें लक्षण । ऐक संपूर्ण हरि बोले ॥९२॥
आश्रमधर्म समस्त करी । परी विधिकिंकरत्व तो न धरी ।
प्रतिबिंब कांपतां जळांतरी । आपण बाहेरी कांपेना ॥९३॥
तेवीं स्वधर्मकर्म कर्तव्यता । करी परी नाहीं कर्मठता ।
आपुली कर्मातीतता । जाणे तत्त्वतां निजकर्मी ॥९४॥
यापरी स्वधर्मकर्म करी । परी विधीचें भय तो न धरी ।
विधिनिषेध घालून तोडरीं । कर्मे करी अहेतुक ॥९५॥
जो नातळे स्वाश्रमकर्मगती । दंडादि लिंग न धरी हातीं ।
ऐसिया सर्वत्यागाची स्थिती । पुढें श्रीपती सांगेल ॥९६॥
प्रस्तुत हेंचि निरूपण । लोकरक्षणार्थ लिंगधारण ।
अंतरीं जो निष्कर्म जाण । त्याचे लक्षण हरी बोले ॥९७॥