आहारार्थं समीहेत युक्तं तत्प्राणधारणम् ।
तत्त्वं विमृश्यते तेन तद्विजाय विमुच्यते ॥३४॥
पाळावया आश्रमधर्मासी । अवश्य हिंडावें भिक्षेसी ।
मधुकरी संन्याशांसी । स्वधर्मासी अतिविहित ॥३९॥
साधकां तरी आहारार्थ । अवश्य हिंडावें लागे येथ ।
आहारेंवीण त्यांचें चित्त । विक्षेपभूत हों पाहे ॥२४०॥
तिंहीं रसासक्ति सांडून । भिक्षेसी करावा प्रयत्न ।
आहारेंवीण त्यांचें मन । अतिक्षीण सर्वार्थीं ॥४१॥
साधकांसी आहारेंवीण । न संभवे श्रवण मनन ।
न करवे ध्यान चिंतन । अनुसंधान राहेना ॥४२॥
संन्याशांसी ध्यान न घडे । तैं आश्रमधर्माचें तारूं बुडे ।
यालागीं भिक्षेसी रोकडें । हिंडणें घडे हितार्थ ॥४३॥
मिळावें मिष्टान्न गोड । हे सांडूनि रसनाचाड ।
करावें भिक्षेचें कोड । परमार्थ दृढ साधावया ॥४४॥
आहार घेतलिया जाण । साधकांसी घडे साधन ।
साधन करितां प्रकटे ज्ञान । ज्ञानास्तव जाण निजमोक्ष लाभे ॥४५॥
सर्वथा न वांछावें मिष्टान्न । तरी भिक्षा मागावी कोण ।
ऐसें कांहीं कल्पील मन । तेंचि श्रीकृष्ण सांगत ॥४६॥