वानप्रस्थाश्रमपदेष्वभीक्षणं भैक्ष्यमाचरेत् ।
संसिद्धयत्याश्वसंमोहः शुद्धसत्त्वः शिलान्धसा ॥२५॥
शुद्ध व्हावया अंतर । वानप्रस्थाश्रमी जो नर ।
जाऊनि ठाकावें त्याचें द्वार । अतिसादर भिक्षार्थ ॥६१॥
सेवितां सात्त्विकाचे अन्नासी । शुद्धसत्त्वता साधकासी ।
तत्काळ होय ग्रासोग्रासीं । शुद्ध अन्नासी हा महिमा ॥६२॥
यालागीं वानप्रस्थाचें द्वार । ठाकोनिजावें वारंवार ।
तेणें सत्त्वशुद्धि अनिवार । होय साचार साधकां ॥६३॥
शुद्ध भिक्षेचिये प्राप्ती । सत्त्वशुद्ध होय वृत्ती ।
तेणें वासना निःशेष नासती । निजशांती उल्हासे ॥६४॥
वासना नासल्या निलाग । तो सत्यत्वें न देखे जग ।
विषयासक्ति कैंची मग । सहज विराग उद्भट ॥६५॥