एवं चीर्णेन तपसा मुनिर्धमनिसन्ततः ।
मां तपोमयमाराध्य ऋषिलोकादुपैति माम् ॥९॥
ऐसें वेदोक्त तप साचार । आस्तिक्यभावें अत्यादर ।
साक्षेपें करितां निरंतर । अस्थिमात्र देह उरे ॥४४॥
शुष्कशरीरपांजरा । त्वचेनें झांकिलिया शिरा ।
परी सामर्थें अति खरा । न सरे माघारा तपोनिष्ठें ॥४५॥
ऐसें यावज्जन्म करितां तप । तो सबाह्य झाला निष्पाप ।
लाहोनि ज्ञान सद्रूप । माझें निजस्वरूप तो पावे ॥४६॥
अवशेष वासना असतां । सूक्षरूप प्रतिबद्धकता ।
तपाभिमानें तत्त्वतां । देहअहंता अणुमात्र ॥४७॥
परी फळाशा पोटीं नाहीं । ऐसेनि निमाला जो देही ।
तो पावोनि ऋषिलोकाच्या ठायीं । तेथोनि पाहीं मज पावे ॥४८॥
जो ऋषिलोकातें पावला । तो क्रमें मुक्तीच्या मार्गा आला ।
तेथूनि क्रमेंचि मज पावला । यापरी उद्धरला वनस्थ ॥४९॥