मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक ३७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


N/A

न हि तस्य विकल्पाख्या या च मद्वीक्षया हता ।

आदेहान्तात्क्वचित्ख्यातिस्ततः संपद्यते मया ॥३७॥

कर्म करणें न करणें । ऐशिया संदेहाचें ठाणें ।

पळालें माझेनि दर्शनें । संकल्पाचें जिणें निमालें ॥५५॥

संकल्पु निमतांचि पोटीं । विराली लिंगदेहाची गांठी ।

भेदाची हारपली त्रिपुटी । मी परमात्मा दिठीं देखतां ॥५६॥

ज्यासी नाहीं भेदाचें भान । त्याचे देहाचें भरण पोषण ।

स्नान-भोजन-शयन । गमनागमन केवीं घडे ॥५७॥

जो जिणोनियां विकल्पभ्रांती । त्रिशुद्धिं मिसळला अद्वैंतीं ।

त्याचे देहाची स्थितिगती । प्रारब्धाहातीं निश्चित ॥५८॥

वृक्ष समूळ उपडलिया पाहें । परी सार्द्रता वृक्षीं राहे ।

तांबूल खाऊनियां जाये । तरी अधरीं राहे सुरंगात ॥५९॥

हो कां कन्यादान केल्या पाहें । वरु कन्याही घेउनि जाये ।

तरी उगा मान उरला राहे । रुसणें न जाये देहान्त ॥२६०॥

तैसा अभिमानाचेनि सळें । मी कर्मकर्ता म्हणवीं बळें ।

ते अहंता निमे ज्ञानबळें । तरी शरीर चळे प्रारब्धें ॥६१॥

कुलाल दंड भांडें घेऊनि जाये । पूर्वभवंडीं चक्र भंवत राहे ।

तेवीं अभिमान गेलिया पाहें । देह वर्तताहे प्रारब्धें ॥६२॥

त्या देहाचें भरणपोषण । प्रारब्धचि करितें जाण ।

ज्ञात्यासी प्रपंचाचे भान । सत्यत्वें जाण असेना ॥६३॥

जैशी मिथ्या छाया देहापाशीं । तैसें देह दिसे सज्ञानासी ।

यालागीं देहबुद्धि त्यासी । सत्यत्वेंसीं उपजेना ॥६४॥

छाया सुखासनामाजीं बैसे । कां विष्ठेवरी पडली दिसे ।

त्या छायेचे अभिमानवशें । सुखदुःख नसे पुरुषासी ॥६५॥

तेवीं देहाची ख्यातिविपत्ती । बाधीना सज्ञानाचे स्थितीं ।

प्रारब्धक्षयाचे अंतीं । विदेह पावती कैवल्य ॥६६॥

जैशी जळाची लहरी । निश्चळ होय सागरीं ।

तैसा ज्ञाता मजमाझारीं । विदेह करी समरसें ॥६७॥

उगम संगम प्रवाहगती । सरितांची नामरूपख्याती ।

जेवीं प्रळयोदकीं हारपती । तेवीं समरसती मजमाजीं ज्ञाते ॥६८॥

अपरोक्ष साक्षात्कार संन्यासी । त्याची स्थितिगति स्वधर्मेंसीं ।

उद्धवा सांगितली तुजपाशीं । आता मुमुक्षु संन्यासी ते ऐक ॥६९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP