भिक्षोर्धर्मः शमोऽहिंसा तप इक्षा वनौकसः ।
गृहिणो भूतरक्षेज्या द्विजस्याऽऽचार्यसेवनम् ॥४२॥
संन्याशासी मुख्य `शम' । सबाह्य `इंद्रियनेम' ।
`अहिंसा' त्याचा स्वधर्म । हा परमधर्म संन्याशासी ॥१२॥
वानप्रस्थाचा स्वधर्म । `तपप्राधान्य मंत्र होम' ।
आतां गृहस्थाचा नेम । तिंही आश्रमां विश्रामदाता ॥१३॥
गृहस्थ मुख्य `अग्निहोत्र' जाण । संन्यासी ब्रह्मचार्यांसी द्यावें अन्न ।
करावें `भूतसंरक्षण' । तेहीं लक्षण अवधारीं ॥१४॥
असिलेनि सामर्थ्यें जाण । अन्न धन वस्त्र जीवन ।
तृण पर्ण निवासस्थान । देऊनि दीन रक्षावे ॥१५॥
ब्रह्मचार्याचे स्वधर्मीं जाण । श्रद्धायुक्त `गुरुसेवन' ।
एवं आश्रमधर्मलक्षण । मुख्यत्वें हें जाण उद्धवा ॥१६॥
गृहस्थाश्रमीं जो धर्म आहे । तो इतर आश्रमीं करूं नये ।
इतराश्रमींचा धर्म पाहें । गृहस्थाश्रमीं होये करणीय ॥१७॥