यदेतदात्मनि जगन्मनोवाक्क्ष्प्राणसंहतम् ।
सर्वं मायेति तर्केण स्वस्थस्त्यक्त्वा न तत्स्मरेत ॥२७॥
मनसा-वाचा-प्राणप्रवाहीं । अहंकारकृत उभयदेहीं ।
जग आत्म्याच्या ठायीं । मिथ्या मायिक पाहीं आभासे ॥७१॥
दोराअंगीं सर्पाभास । शुक्तिकेमाजीं रजतप्रकाश ।
उखरीं मृगजळाचा विलास । तैसा जगदाभास चिन्मात्रीं ॥७२॥
जैसा स्वप्नींचा व्यवहार । तैसें भासे चराचर ।
ऐसें मिथ्या जाणोनि साचार । पुढती स्मरणादर स्फुरेना ॥७३॥
जो जागा झाला इत्थंभूत । तैं स्वप्नभोग न वांछी चित्त ।
तेवीं स्वरूपीं जो सुनिश्चित । तो प्रपंचजात स्मरेना ॥७४॥
त्रिदंडी बहूदकाचें कर्म । तुज म्यां सांगितलें सुगम ।
आता हंस परमहंसांचे धर्म । यथानुक्रम अवधारीं ॥७५॥
संन्यास चतुर्विध देख । `हंस' `परमहंस' एक ।
एक तो `बहूदक' । `कुटीचक' तयासी बोलिजे ॥७७॥
वार्धकीं कुटीचकाची परी । अग्निहोत्र-स्त्रियेचा त्याग करी ।
परी शिखासूत्र न अव्हेरी । गायत्रीमंत्रीं अधिकारु ॥७८॥
नित्य भिक्षा पुत्राचे घरीं । पर्णकुटी बांधे त्याचे द्वारीं ।
मठिका सांडोनि न वचे दूरी । `कुटीचक' निर्धारीं या नांव ॥७९॥
शिखासूत्र त्यागोनि जाण । करूनि त्रिदंडांचें ग्रहण ।
केवळ करी कर्माचरण । ज्ञानाचें लक्षण जाणेना ॥१८०॥
नाहीं वैराग्य वरिष्ठ । न दिसे ज्ञाननिष्ठा श्रेष्ठ ।
अतिशयेंसीं जो कर्मिष्ठ । `बहूदक' ज्येष्ठ त्यासी म्हणती ॥८१॥
जो कां वैराग्याच्या निर्धारीं । ज्ञानसाधनार्थ विचारी ।
शिखासूत्रकर्मत्याग करी । आत्मचिंतनावरी निजनिष्ठा ॥८२॥
ऐसा जो त्यागविलास । या नांव `विविदिषा' संन्यास ।
ऐशिया निष्ठें वर्ते तो `हंस' । एक `परमहंस' हा म्हणती ॥८३॥
ऐक परमहंसाचें लक्षण । ज्ञानपरिपाकें परिपूर्ण ।
अतएव शांति वोळंगे आंगण । देखे तिन्ही गुण मिथ्यात्वें ॥८४॥
मिथ्या जाणे कर्माची वार्ता । आपुली देखे नित्य निष्कर्मता ।
कर्मक्रिया जो कर्तव्यता । ते प्रकृतीचे माथां प्रारब्धें ॥८५॥
ऐशिया स्थितीं सावकाश । त्या नांव जाण `परमहंस' ।
नाहीं मठ मठिका विलास । नित्य उदास निराश्रयी ॥८६॥
आतां हंस-परमहंसांचे धर्म । स्वयें सांगताहे पुरुषोत्तम ।
त्या धर्माचें विशद वर्म । ऐक सुगम उद्धवा ॥८७॥