मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


इति स्वधर्मनिर्णिक्तसत्त्वो निर्ज्ञातमद्‍गतिः ।

ज्ञानविज्ञानसंपन्नो नचिरात्समुपैति माम् ॥४६॥

ऐशिया पदाची पदप्राप्ती । साधक पावले स्वधर्मस्थितीं ।

ते स्वधर्मप्रयोजनगती । यथानिगुती सांगत ॥३३॥

करितां स्वधर्मानुष्ठान । रजतमें नाशती जाण ।

शुद्धसत्त्व अंतःकरण । तेथ माझें ज्ञान प्रकाशे ॥३४॥

प्रकाशल्या माझें ज्ञान । तेणें उल्हासे माझें भजन ।

भजनास्तव मन । विकल्पपण पैं त्यागी ॥३५॥

विकल्पत्यागाचिये गतीं । वैराग्यें उचंबळे विरक्ती ।

भासे परमात्मा सर्व भूतीं । तेणें `परमभक्ती' उल्हासे ॥३६॥

उल्हासल्या परमभक्ती । भक्तासी माझी स्वरूपप्राप्ती ।

तेचि स्वरूपाची स्वरूपस्थिती । यथानिगुतीं सांगत ॥३७॥

परमात्मा परंज्योती । परब्रह्म परंज्ञप्ती ।

परात्परतर प्रकृती । वेद बोलती `परावर' जो ॥३८॥

अज अव्यय अक्षर । अरूप अनाम अगोत्र ।

अलक्ष अतर्क्य अपार । अपरंपारस्वरूप ॥३९॥

ऐशी निजस्वरूपीं निजप्राप्ती । भक्त पावले स्वधर्मस्थिती ।

जेथूनि परतलिया श्रुती । नेतिनेतीं निजनिष्ठा ॥३४०॥

ऐसें मद्‌रूप पावल्यापाठीं । संसाराची काढिली कांटी ।

नांवरूपांची बुडाली गोठी । पडली तुटी जन्ममरणां ॥४१॥

एवं स्वधर्माचेनि धर्मवशें । मीतूंपणाचें नांवचि पुसे ।

मद्‌रूपाचेनि सामरस्यें । अनायासें मीचि जाहले ॥४२॥

`पूर्वीं होतों मी जीव । आतां झालों सदाशिव' ।

हाही बुडाला आठव । ऐसा माझा अनुभव मद्‍भक्तां ॥४३॥

शून्य पडिलें संसारस्थिती । तेथ कैंची पुनरावृत्ती ।

ऐशी मद्‍भक्तां माझी प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥४४॥

एवं स्वधर्में मत्प्राप्ति जाण । तया स्वधर्माचें महिमान ।

स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । सावधान परियेसा ॥४५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP