तावत्परिचरेद्भक्तः श्रद्धावाननसूयकः ।
यावद्ब्रह्म विजानीयान्मामेव गुरुमादृतः ॥३९॥
अचळ अमळ अविनाश । परात्परतर परेश ।
गुरु तो परब्रह्म ईश । हा दृढ विश्वास धरावा ॥७८॥
त्या विश्वासाच्या पडिपाडीं । नवल गुरुचरणीं आवडी ।
नित्य नूतन नवी गोडी । चढोवढी भजनार्थ ॥७९॥
ऐशिया भजनपरवडीं । हृदयीं श्रद्धा उसळे गाढी ।
गुरुआज्ञेची नुल्लंघी काडी । आळस तोडी समूळ ॥२८०॥
गुरुवाक्याचेनि श्रवणें । विकल्पाचें खत खाणणें ।
संकल्पासी सूळीं देणें । जीवें घेणें अभिमाना ॥८१॥
तेथ असूया कैंची उठी । धाकेंचि निमाली उठाउठी ।
ऐशी गुरुचरणीं श्रद्धा मोठी । परब्रह्मदृष्टीं गुरु पाहे ॥८२॥
निर्गुण जो निर्विकारु । तोचि मूर्तिमंत माझा गुरु ।
करूनि अकर्ता ईश्वरु । तोचि हा साचारु गुरु माझा ॥८३॥
नित्य निर्विकल्प देख । ज्यासी म्हणती समाधिसुख ।
तें माझ्या गुरूचें चरणोदक । ऐसा भावें नेटक भावार्थी ॥८४॥
गुरूतें पाहतां ब्रह्मदृष्टीं । शिष्य ब्रह्मत्वें आला पुष्टी ।
ब्रह्मरूप देखे सृष्टी । निजऐक्यें मिठी गुरुचरणीं ॥८५॥
ऐसें ब्रह्मरूपीं ऐक्य घडे । तंव गुरुसेवा करणें पडे ।
ऐक्य झाल्याही पुढें । सेवा न मोडे अखंडत्वें ॥८६॥
कापूर घातलिया जळीं । स्वयें विरोनि जळ परमळी ।
तेवीं अहं जाऊनि सेवा सकळी । सर्वीं सर्वकाळीं गुरुचरणीं ॥८७॥
ऐशी अवस्था न येतां हाता । केवळ मुंडूनियां माथा ।
संन्यासी म्हणवी पूज्यता । त्याची अनुचितता हरि बोले ॥८८॥
स्वयें संन्यास अंगीकारी । ब्रह्मसाक्षात्कार जो न करी ।
त्यालागीं स्वयें श्रीहरी । अतिधिक्कारीं निंदीत ॥८९॥