दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलम् ।
सत्यपूतां वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत ॥१६॥
दृष्टि ठायीं ठेवूनि जाण । पृथ्वी पाहूनि पावन ।
हंसगतीं करी गमन । अनुसंधान निजवृत्तीं ॥८६॥
जेथ जीवसंपदा दृष्टीं पडे । तैं प्राण गेल्या न चले पुढें ।
जीवांतें काढूनि कडे । पाऊल पडे अतिशुद्ध ॥८७॥
आधींच पवित्र गंगाजळ । त्याचा निर्मळ वस्त्रें निरसोनि मळ ।
यापरी करोनियां निर्मळ । गंगाजळ सेविती ॥८८॥
ज्याचे वाचेचे आळां । असत्याच्या तृणशाळा ।
जाळूनि वैराग्यज्वाळा । सत्याचा उगवला कल्पद्रुम ॥८९॥
ज्या कल्पद्रुमाचीं वचनफळें । परिपक्वे आणि सोज्वळें ।
मधररसेंसीं रसाळें । अतिनिर्मळें घमघमितें ॥९०॥
जें श्रवणीं अतिगोड । पुरवी श्रोतयांचें कोड ।
निववी जीवाची चाड । सत्य सुरवाड हा वाचेचा ॥९१॥
सहजें संन्याशाचें ध्यान । `अहमेव नारायण' ।
तें दृढ धरोनि अनुसंधान । पवित्र मन करावें ॥९२॥
मन करोनि पावन । पृथ्वी विचरावी जाण ।
त्या मनाचें पवित्रपण । सर्वत्र आपण लक्षावें ॥९३॥
संन्याशाचे धर्मीं जाण । मुख्यत्वें हेंचि लक्षण ।
पवित्र करोनि अंत:करण । सर्वत्र नारायण लक्षावा ॥९४॥
मनाचें पवित्रपण । उद्धवा या नांव जाण ।
आतां त्रिदंडाचें लक्षण । संन्यासनिरूपण तें ऐक ॥९५॥