भिक्षां चतुर्षु वर्णेषु विगर्ह्यान्वर्जयंश्चरेत् ।
सप्तागारानसंक्लृप्तांस्तुष्येल्लब्धेन तावता ॥१८॥
पूर्वी जाण संन्याशासी । चतुर्वर्णीं भिक्षा होती त्यासी ।
कलियुगीं गोष्टी झाली कैसी । ब्राह्मणापाशीं चतुर्वर्ण ॥५॥
ज्याची जीविका जेणें जाण । त्या ब्राह्मणाचा तोचि वर्ण ।
ऐका तेंही प्रकरण । जीविकालक्षण सांगेन ॥६॥
`मुख्य ब्राह्मणाची वृत्ती' जाण । `शिल' `उंछ' का `कोरान्न' ।
अयाचित का अध्यापन । अथवा याजन जीविकेसी ॥७॥
जो जीविकेलागीं निर्धारीं । शस्त्र घेऊनियां करीं ।
शूरवृत्तीं जीविका करी । तो जाणावा `क्षत्री' ब्राह्मणांमाजीं ॥८॥
जो वाणिज्यवृतीवरी । नित्य जीविका आपुली करी ।
तो ब्राह्मण ब्राह्मणामाझारीं । `वैश्य' निर्धारीं निश्चित ॥९॥
जो शूद्राचे शूद्रक्रियेवरी । सदा सर्वदा जीविका करी ।
तो ब्राह्मण शूद्रकर्मेंकरीं । `शूद्रत्व' धरी क्रियायोगें ॥११०॥
जैं उत्तम ब्राह्मणाची भिक्षा न लभे । तैं क्षत्रियब्राह्मणीं भिक्षा लाभे ।
क्षात्रब्राह्मणांचेनि अलाभें । वैश्यादि ब्राह्मणीं लाभे भिक्षाग्रहण ॥११॥
ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्यब्राह्मणीं । भिक्षेस अप्राप्त हे तिनी ।
तैं शूद्रजीविका-ब्राह्मणीं । भिक्षाग्रहणीं अधिकारु ॥१२॥
यांत निंद्य जे ब्राह्मणाआंतु । केवळ दोषी अथवा अभिशप्तु ।
ते भिक्षेसी न लावावा हातु । हा स्वधर्मार्थु भिक्षेचा ॥१३॥
तेही भिक्षा अतिनेमस्त । भिक्षेसी येतों हें कळों नेदित ।
मागावीं नेमिलीं घरें सात । जें झालें प्राप्त तेणें सुखी ॥१४॥
जे सातां घरीं भिक्षा प्राप्त । ते भिक्षेचा धर्म विहित ।
स्वयें सांगे श्रीकृष्णनाथ । स्मृतिशास्त्रार्थप्रयोगें ॥१५॥