यस्त्वसंयतषड्वर्गः प्रचण्डेन्द्रियसारथिः ।
ज्ञानवैराग्यरहितस्त्रिदण्डमुपजीवति ॥४०॥
सुरानात्मानमात्मस्थं निन्हते मां च धर्महा ।
अविपक्वकषायोऽस्मादमुष्माच्च विहीयते ॥४१॥
नाहीं वैराग्याची स्थिती । नसतां विषयविरक्ती ।
देखोदेखीं संन्यास घेती । केवळ वृत्ती अन्नार्थ ॥२९०॥
संन्यास नेघतां पूर्व दृष्टीं । जें वैराग्य होतें पोटीं ।
तें संन्यास घेतल्यापाठीं । उठाउठीं पळालें ॥९१॥
ज्ञानेंद्रियें पांच सहावें मन । हेचि अरिषड्वर्ग जाण ।
यांचें न करितां निर्दळण । संन्यासपण तो विटंबु ॥९२॥
अवैराग्यें सकाम मन । तेणें विषयाकुलित बुद्धि जाण ।
नाहीं ज्ञान ध्यान साधन । दंडग्रहण उदरार्थ ॥९३॥
नुपजेच अनुताप जाण । न करीच श्रवण मनन ।
आदरें न साधीचि साधन । त्यासी ब्रह्मज्ञान नव्हेचि ॥९४॥
त्याचा व्यर्थ संन्यास जाण । व्यर्थ त्याचें दंड मुंडण ।
व्यर्थ काषायवस्त्रग्रहण । जेवीं वेषधारण नटाचें ॥९५॥
संन्यास घेतलिया पाठीं । काम उचंबळे उठाउठीं ।
क्रोधलोभांची धुमे आगिटी । चौगुणा पोटीं अभिमान ॥९६॥
आसक्ति अधिकाधिक उठी । सदा ग्रामणी चावटी ।
करणें पैशुन्याच्या गोष्टी । दंड कासोटी दंभार्थ ॥९७॥
अनधिकारीं दंडग्रहण । तेणें संन्यासरूपें जाण ।
केवळ आली नागवण । आपल्या आपण नाडिलें ॥९८॥
नाडिले यज्ञाधिकारी सुरगण । नाडिले स्वधाकाराचे पितृगण ।
नाडिले ऋषि भूतगण । बळिअर्पण ठाकेना ॥९९॥
जीवरूपें मी परमात्मा आपण । त्या मज हृदयस्था ठकिलें जाण ।
जीवोद्धारीं जें संन्यासग्रहण । तेंचि दृढबंधन त्यासी झालें ॥३००॥
संन्यासग्रहणीं दृढबंधन । व्हावया कोण कारण ।
तेचि विषयींचें निरूपण । स्वयें नारायण बोलिला ॥१॥
पूर्वश्लोकींचे तिनी चरण । येथील हें निरूपण ।
श्रोतीं द्यावें अवधान । झणें विलक्षण कोणी म्हणे ॥२॥
``निन्हुते मां च धर्महा । अविपक्वकषायोऽस्मादमुष्माञ्च विहीयते ॥''
करोनियां संन्यासग्रहण । न करी ज्ञान ध्यान साधन ।
न करी प्रणवउच्चारण । अविरक्त जाण विषयार्थी ॥३॥
तेणें दारादिअभिलाषण । करिती द्रव्याचें संरक्षण ।
आणि गोदानादि ग्रहण । पचन पाचन करविती ॥४॥
मठाधिपत्याचिये बुद्धीं । धनधान्यस्नेहसमृद्धी ।
नाना वाढवितां उपाधी । जीवात्मा त्रिशुद्धी नाडिला ॥५॥
ऐसें करितां अधर्मपण । जीवासी लागलें दृढ बंधन ।
जेणें इहलोकपरलोकसाधन । त्या नरदेहासी जाण नाडिलें ॥६॥
चौर्याशीं लक्ष योनींप्रती । जैं असंख्य फेरे होती ।
तैं नरदेहाची प्राप्ती । अवचटें पावती सभाग्य ॥७॥
त्या नरदेहासी येऊनि जाण । स्वयें नागवला आपण ।
करितां अधर्माचरण । नरक दारुण संन्याशा ॥८॥
ज्या नांव गा `आश्रम चौथा' । ज्यासी देवो वंदी माथां ।
तेथेंही अधर्म करितां । नरकपाता पावले ॥९॥
ज्या नरकाचे ठायीं । कोटि वर्षें बुडतां पाहीं ।
ठावचि न लागें कंहीं । तैसे ठायीं बुडाले ॥३१०॥
मुख्य चतुर्थाश्रमीं हे स्थिती । तैं इतर आश्रमां कैंची गती ।
यालागीं आश्रमधर्मयुक्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥११॥