तस्मान्नियम्य षड्वर्गं मद्भावेन चरेन्मुनिः ।
विरक्तः क्षुल्लकामेभ्यो लब्ध्वाऽऽत्मनि सुखं महत् ॥२३॥
येणें विचारें विचारिता । विषयासक्ती दृढबद्धता ।
त्या विषयांचा त्याग करितां । निजमुक्तता सहजेंचि ॥४२॥
तेचि विषयांची विरक्ती केवीं । आतुडे आपुल्या हातीं ।
यालागीं वैराग्याची उत्पत्ती । साधकें निश्चितीं साधावी ॥४३॥
अंतरीं वासना दृढमूळ । विषयशाखा तेणें सबळ ।
ते वासना छेदावया समूळ । वैराग्य सबळ साधावें ॥४४॥
वैराग्यप्राप्तीचें कारण । स्वधर्मकर्म मदर्पण ।
सांडावें कर्माचें कर्तेपण । `मदर्पण' या नांव ॥४५॥
मदर्पणें कर्मस्थिती । तेणें माझ्या ठायीं उपजें प्रीती ।
माझें नाम माझी कीर्ती । चिंतन चित्तीं पैं माझें ॥४६॥
ऐशिया माझ्या परम प्रीतीं । होय वैराग्याची उत्पत्ती ।
तेणें विषयांची विरक्ती । माझी सुखप्राप्ती शनैःशनैः ॥४७॥
माझेनि सुखें माझें भजन । अत्यंत थोरावे पैं जाण ।
तेव्हा सर्वत्र मद्भावन । ब्रह्मत्वें पूर्ण ठसावे ॥४८॥
सर्वत्र ब्रह्मभावन । ब्रह्मसुखाचें अनुसंधान ।
धरूनि करावें पर्यटण । जंव निर्वासन मन होय ॥४९॥