यदासौ नियमेऽकल्पो जरया जातवेपथुः ।
आत्मन्यग्नीन् समारोप्य मच्चित्तोऽग्निं समाविशेत् ॥११॥
सर्वथा वैराग्य नुठी देहीं । जरा आदळली ठायींचे ठायीं ।
स्वधर्माचरणीं शक्ति नाहीं । कंप पाहीं सर्वांगीं ॥६१॥
ऐसा वानप्रस्थवनवासी । आत्मसमारोप करूनि अग्नीसी ।
मातें दृढ ध्याऊनि मानसीं । अग्निप्रवेशीं रिघावें ॥६२॥
वानप्रस्थाश्रमीं वनस्थ । अतिशयें झाला जो विरक्त ।
त्याची उत्तरविधि समस्त । स्वयें भगवंत सांगतसे ॥६३॥