नैतद्वस्तुतया पश्येद् दृश्यमानं विनश्यति ।
असक्तचित्तो विरमेदीहामुत्र चिकीर्षितात् ॥२६॥
येथ जें जें दिसे नासे । हें सर्वांसी प्रत्यक्ष आभासे ।
परी अज्ञानें भुलले कैसे । विषयविलासें गुंतोनी ॥६६॥
यालागीं शुद्ध भिक्षेचिये प्राप्ती । ज्याची शुद्धसत्व झाली वृत्ती ।
त्यासी विषय सत्यत्वें न दिसती । मा विषयासक्ती तेथें कैंची ॥६७॥
ऐसें मिथ्या विषयांचें भान । त्याचें विषयासक्त नव्हे मन ।
यालागीं भवस्वर्गसाधन । दोन्ही तो जाण स्पर्शेना ॥६८॥
ऐसा जो विषयविरक्त । त्याचें परमार्थीं लागे चित्त ।
तो जगीं विचरे अनासक्त । परमार्थयुक्त निजबोधें ॥६९॥
त्याच्या निजबोधाचें लक्षण । स्वयें सांगताहे नारायण ।
प्रपंचाचें मिथ्यापण । समाधान निजात्मता ॥१७०॥