रमावल्लभदास
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
कृष्णा रामा रे सखया कृष्णा रामा रे ।
आनंदधामा रे माझ्या पूर्ण कामा रे ॥ध्रु०॥
कृष्णा पूतनाशोषण, । रामा ताटिकाखोंचण ।
शोषण खोंचण माझ्या कृष्णा रामा रे ॥१॥
कृष्ण शकटदंडण । रामा धनुषखंडन ।
दंडण खंडण माझ्या कृष्णा रामा रे ॥२॥
कृष्णा गुहयक उद्धरण । रामा अहल्यातारण ।
उद्धरण तारण माझ्या कृष्णा रामा रे ॥३॥
कृष्णा व्रजनारीखेळण । रामा वानरमेळण ।
खेळण मेळण माझ्या कृष्णा रामा रे ॥४॥
काळयवनदलन । विकट तालच्छेदन ।
दलन छेदन माझ्या कृष्णा रामा रे ॥५॥
कृष्णा भीमकीहरण । रामा जानकीवरण ।
हरण वरण माझ्या कृष्णा रामा रे ॥६॥
रमावल्लभदास्यपण । कृष्ण देतो आपण ।
तुझें चरणस्मरण माझ्या कृष्णा रामा रे ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP