आनंदतनय
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
१.
देव करील दया । तयावरि देव करील दया ॥ध्रु०॥
रक्षक तो सकळां कमळापति । जाणुनि न धरि भया ॥तया०॥
स्वपर म्हणुनि मति न धरि चराचरीं । निर्मळ भाव जया ॥तया०॥
आनंदतनय म्हणे हरिच्या कीर्तनिं । काशि प्रयाग गया ॥तया०॥
२.
ऐका हो अदभुत देणें त्या एका भगवंताचें ॥ध्रु०॥
नेणें पूजा नेणें सेवा । शरणांगत मी आलों देवा ।
म्हणतां देवोनियां निज खेंवा । दिधलें स्थान सोन्याचें ॥ऐका०॥
केवळ मुग्धाचिये धाटी । आळी घेतां दुग्धासाठीं ।
दिधली क्षीराब्धीची वाटी । बाळक धालें विप्राचें ॥ऐका०॥
उंचीं बैसायाच्या काजा । निघतां निपिना गाजावाजा ।
केला अढळ पदींचा राजा । निरखी अजुनि जन साचें ॥ऐका०॥
भेटी नेले पोहे मुष्टी । तेणें देवा झाली तुष्टी ।
आली सौभाग्यासी पुष्टी । झालें कल्याण दुबळ्याचें ॥ऐका०॥
बोले आनंदाचा बाळ । होती मुक्याचे वाचाळ ।
पांगुळे लंघिति पर्वतमाळ । होईल पीय़ूष विखाचें ॥ऐका०॥
३.
जो नर नटका । हरि वदनीं न येचि घटका ॥धु०॥
निमा जामा फिरकी पगडी माजीं शोभे पटका ।
मखमाली पैजार पायिं चालतां मोठा वाजे चटका ॥१॥
उष्ण वरान्नें सघृत शर्करा भोजनिं गोधुमकटका ।
अतिथि आलिया विन्मुख होऊनि आपणचि करितां गटका ॥२॥
मृदु शय्येवरि तरुणीपत्नी सन्निध बाव्या चिटका ।
लौकीकास्तव कथेसि जाउनि प्रेमें डोले लटका ॥३॥
जिव्हाशिस्नपरायण त्यावरि कळिकाळाचा फटका ।
हंसत हंसत आनंदतनय म्हणे कैसी होईल सुटका ॥४॥
संसारार्णवतारक संशयतमसूर्या ।
सज्जनमुकृतालंकृत चिन्मयवैडूर्या ।
धार्मिक जन घन. वर्णिति तव चर्या ।
स्वानदैकविहारा स्वामी गुरुवर्या ॥१॥
जय देव जय देव जय जी आनंदा । जय परमानंदा ।
जानोज्ज्वलनीरांजन तुज निज सुखकंदा ॥ध्रु०॥
नमितां तुझिया, न दिसे भवममता ।
रमतां निजात्मबोधें जगिं भरली समता ।
श्रमतां बहुविध जन्मीं जाली विश्रमता ।
दमितां मन मग कैंचीं भवभयविभ्रमिता ॥२॥
अपाप तव पदभजनें अपाप मी झालीं ।
कृपापांगें तुझिया उदरा मग आलों ।
अपाय गेले उज्पाययोगें बहु धालों ।
आनंदतनय विनवी परिपूर्ण झालों ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP