उपोध्दात
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
श्लोक.
नमूनि देवदेवातें । रसिकस्वातंतर्पण ॥
बालबोधार्थ करितों । अल्प हें वृत्तदर्पण ॥१॥
छंदें वृत्तें संस्कृतांत । वर्णिलीं असती मुळीं ॥
पाहून त्याच रीतीनें । देशभाषेंत सांगतों ॥२॥
काव्य दोन प्रकारचें आहे; एक गद्यरुप आणि एक पद्यरुप. ज्याला पाद किंवा चरण नाहींत तें गद्य आणि ज्याला पाद आहेत तें पद्य. पद्याच्या अक्षरनियमाला व मात्रानियमाला अनुक्रमें वृत्त व जाति असें म्हणतात. छंदांविषयीं संस्कृत भाषेंत पिंगलादिकांनी नियम सांगितले आहेत, ते प्राकृत जनांस समजण्याकरितां त्याच नियमांच्या आधारानें त्यांचीं लक्ष्यलक्षणें महाराष्ट्रभाषेंत पद्यरुपानें सांगतो.
गीति.
छंद: शास्त्रीं जितकी । छंदें वृत्तें सुवर्णिलीं असती ॥
तितकीं प्राकृत भाषे - । मध्यें कोणीहि घेतलीं नसती ॥३॥
प्राकृत कविंनीं जीं जीं । वृत्तें पाहोन घेतली गोडी ॥
तीं तींच वर्णितों मी । येतिल बहुतेक, राहतिल थोडीं ॥४॥
संस्कृत भाषेंत छंदाचे प्रकार बहुत आहेत, म्हणजे एक अक्षराचा पाद, दोन अक्षरांचा पाद, तीन अक्षरांचा पाद, असे चढत चढत सव्वीस अक्षरांच्या पादापर्यंत छंद सांगितले आहेत. परंतु प्राकृत भाषेंत तितके प्रकार प्रसिध्द नाहींत.
एका अक्षरापासून सात अक्षरांपर्यत चरणाचे छंद येथें घेतले नाहींत, आठ अक्षरांच्या चरणापासून तेवीस अक्षरांच्या चरणापर्यत मात्र छंद एथें घेतले आहेत.
गीति.
मात्राक्षरसंघाच्या । रचनेला जाति वृत्त वा वदती ॥
मात्राक्षरगणभेदीं । भेद तयांचे अनेक ते होती ॥५॥
चरणांचीं अक्षरें सारखीं असून गणभेदांनीं वृत्तभेद पुष्कळ होतात. त्यांतून प्रसिध्द वृत्तें मात्र एथें घेतलीं आहेत.
परिभाषा.
गण दोन प्रकारचे आहेत; अक्षरगण आणि मात्रागण. अक्षरगण आठ आहेत, आणि मात्रागण पांच आहेत.
अक्षरगण.
दिंडी.
गणामध्यें अक्षरें तीन येती ॥ र्हस्वदीर्घानीं आठ भेद होती ॥
य र त न भ ज स म हीं अशीं आठ नांवें ॥ रुप त्यांचें सांगतों आयकावें ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP