अतिसार होण्याची कारणें .
गुर्वतिस्निग्धतीक्ष्णोष्णद्रवस्थूलातिशीतलै : ॥
विरूद्धाध्यशनाजीणौंर्विषमैश्चातिभोजनै : ॥१॥
स्नेहाद्यैरतियुक्तैश्च मिथ्यायुक्तैर्विर्षभयै : ॥
शोकदुष्टाम्बुमद्यातिपानै : सात्म्यर्तुपर्ययै : ॥२॥
जलाभिरमणैर्वेगविघातै : कृतिदोषत : ॥
नृणां भवत्यतीसारो लक्षणं तस्य वक्ष्यते ॥३॥
प्रमाणाहून अधिक खाल्याने , अतिशय तीक्ष्ण , उष्ण , कठीण , स्निग्व , जड , द्रव , घट्ट , थंड आणि विरुद्ध असे पदार्थ भक्षण केल्याने , अध्यशन ( जेवणावर जेवण ), अपक्क अन्न ( कच्चे अन्न ) खाल्याने , अवेळी ( रोजची जेवणाची वेळ सोडून जेवण केल्याने किंवा फार जेवल्याने , अयोग्य प्रकारे खाल्ल्याने , स्नेहस्वेदादि पंचकर्मांचा ) कमी जास्त योग केल्याने , विष खाल्ल्याने , अति मद्यपान केल्याने , भय व शोक प्राप्त झाल्याने , दूषित पाणी व मद्य ही प्याल्याने , पाण्यांत डुंबल्याने , ऋतुंत बदल झाल्याने मळमूत्राचा अबरोध केल्याने , आणि जंत झाल्याने मनुष्यास अतिसर होतो . त्याची लक्षणे पुढे लिहिल्याप्रमाणे जाणावी .
अतिसाराची संप्राप्ति .
संशम्यापां धातुरग्निं प्रवृद्धो वर्चोमिश्रो वायुनाध : प्रणुन्न ॥
सार्येतातीवातिसारं तमाहुर्व्याधिं घोरं षड्वीधं तं वदन्ति ॥४॥
एकैकश : सर्वशश्चापि दोषै : शोवे नान्य : षष्ठ आमने चोक्त : ॥
रस , मूत्र , घाम , मेद , कफ , पित्त व रक्त या शरिरातील सप्त आपधातूंच्या आश्रयाने राहणारा जलांश फार वाढल्यामुळे तो जठराग्नीला मंद करून मळाशी मिश्रित होतो व वायूच्या द्वारे गुदमार्गाने खाली नेला जाऊन सगतो ; त्यासच अतिसर असे म्हणतात . हा रोग फार भयंकर असून त्याचे वातजन्य , पित्तजन्य व कफजन्य या तीन दोषांपासून पृथक उत्पन्न होणारे तीन , सन्निपातजन्य ( तिन्ही दोषांपासून उत्पन्न झालेला ) एक आणि शोकजन्य व आमजन्य हे दोन मिळून सहा प्रकार सांगितले आहेत . ( या सहा प्रकारांस अनुक्रमे वातातिसार , पित्तातिसार , कफातिसार , सन्निपातातिसार शोकातिसार आणि आमातिसार अशा संज्ञा आहेत .)
अतिसाराचें पूर्वरूप .
हृन्नाभिपाथूदरकुक्षितोद -
गात्रावसादानिलसन्निरोधा : ॥
विट्सङ्गआध्मानमथाविपाको
भविष्यतस्तस्य पुर : सराणि ॥५॥
ह्रदय , नाभि , गुढ , पोट व कुशी यांमध्ये टोचल्यासरखी वेदना होणे , हातपाय गळणे , अपानवायूचा रोध होणे , मलसंचय , अन्नाचा पाक बरोबर रितीने न होऊन पोट फुगणे या प्रकारची अतिसाराचीं पूर्वरूपे समजावी .
वातातिसाराचीं लक्षणें
अरूणं फेनिलं रुक्षमल्पमल्पं मुहुर्मुहु : ॥
शकृदामं सरूक्शब्दं मारूतेनातिसार्यते ॥६॥
ज्या अतिसारांत तांबडा , फेसाचा , कोरडा पक्व न झालेला मळ वारंवार आणि थोडा थोडा पडतो ; ढाळ होतें वेळी शब्द होतो आणि पोटात मुरडा होतो तो वातातिसार होय .
पित्तातिसाराची लक्षणें .
पित्तात्पीतं नीलमलोहितं वा ।
तृष्णा मूर्च्छा दाहपाकोऽपराङ्गे ॥
पित्तातिसारांत पित्तदोषामुळे पिवळा , निळा व तांबडा असा मळ पडतो . गुदद्वाराचे ठिकाणी पुरळ येतो , तहान , लागते . भोंवळ येते आणि सर्वांगाचा दाह होतो .
कफातिसाराचीं लक्षणें .
शुक्लं सान्द्रं सकफं श्लेष्मणा तु ।
विस्रं शीतं ह्रष्टरोमा मनुष्य : ॥७॥
पांढरा , घट्ट , कफयुक्त , व दुर्गंध असलेला व थंड असा मळ पडून रोग्याच्या अंगावर रोमांच उमे राहिले म्हणजे कफातिसार झाला असे म्हणावे .
सन्निपातातिसाराचीं लक्षणें .
वारोहस्नहमांसाम्बुसद्दशं सर्वरूपिणम् ॥
कृच्छ्रसाध्यमतीसार विद्याद्दोषत्रयोद्भवम् ॥८॥
वर सांगितलेल्या वातादि दोषत्रयापासून उत्पन्न झालेल्या अतिसाराची सर्व लक्षणे ज्यांत असून शिवाय मांस धुतलेल्या पाण्यासारखे व डुकराच्या चरबीसारखे ढाळ ज्यांत होतात तो सन्निपातातिसार बरा करण्यास कठीण असतो .
शोकातिसाराचीं लक्षणें .
तैस्तैर्भावै : शोचतोऽल्पाशनस्य
वाष्पोष्मा वै वन्हिमाविश्य जन्तो : ॥
कोष्ठं गत्वा क्षोभयेत्तस्य रक्तं
तं चाधस्तात्काकणन्तीप्रकाशम् ॥९॥
निर्गच्छेद्वै विङ्विमिथं ह्यविड वा
निर्गन्धं वा गन्धवद्वातिसार : ॥
शोकोत्पन्नो दुश्चिकित्स्योऽतिमात्रं
रोगो वैद्यै : कष्ट एष प्रदिष्ट : ॥१०॥
( द्रव्यनाश , स्त्रीवियोग वगैरे ) त्या त्या कारणांनी शोक उत्पन्न होऊन ज्याचे अन्न तुटते त्या मनुष्यास शोकातिसार होतो . त्याचा प्रकार असा की , रोग्याचा बाष्पसंबंधी ( नेत्रावाटे गळणार्या अश्रूसंबंधी ) उष्मा त्याच्या कोठयात शिरून , जठराग्नीशी मिश्र होऊन त्याच्या रवताला क्षोभवितो , मग तांबडया गुंजेसारख्या रंगाचे मळमिश्रित , किंवा मळरहित घाण असलेले किंवा नरूलेले असे त्याचे रक्त गुदद्वारावाटे बाहेर पडते , याप्रमाणे झालेला हा शोकातिसार वैद्यास चिकित्सा करण्यास कठीण जातो . ( कारण रोग्याचा शोक शमन झाला नसला तर नुसत्या औषधाने त्यास गुण येणे शक्य नाही .)
आमातिसाराचीं लक्षणें .
अन्नाजीर्णात्प्रदुता : क्षोभयन्त : कोष्ठं दोषा धातुसङघान्मलांश्च
नानावर्णं नैकश : सारयन्ति शूलोपेतं शष्ठमेनं वदन्ति ॥११॥
अन्न न जिरल्यामुळे वात , पित्त , कफ हे त्रिदोष आपला मार्ग सोडून कोठयांत जाऊन - त्याचा क्षोभ करून - जे रवतादि धातु व पुरीषादि मळांना गुदद्वागवाटे बाहेर टाकतात त्यास सामातिसार म्हणतात . त्याचा रंग तर्हतर्हेचा असतो व पोटांत फार मुरडा होतो . हा अतिसाराचा सहावा प्रकार आहे .
अपक्व आणि पक्क मल लक्षणें .
संसृष्टमेभिर्दोषैस्तु न्यस्तमप्स्ववसीदति ॥
पुरीषं भृशदुर्गन्धि पिच्छिलं चामसंज्ञितम् ॥१२॥
एतान्येव तु लिङ्गानि विपरीतानि यस्य वै ॥
लाघवं च विशेषेण तस्य पक्वं विनिर्दिशेत् ॥१३॥
वर सांगितलेल्या त्रिदोषजन्य अतिसाराच्या लक्षणांनी युक्त असलेल्या मळापैकी जो पाण्यांत टाकिला असता बुडतो आणि त्यांत दुर्गंध व बुळबुळीतपणा हे फार असतात तो अपक्व मळ होय . त्याच्या उलट लक्षणांचा म्हणजे जो पाण्यात टाकला असता वर तरंगतो आणि ज्यास दुर्गंव व बुळबुळीतपणा नसतो , व रोग्याच्या शरीरास हलकेपणा विशेष असतो तो मल पक्व जाणावा .
अतिसाराचीं असाध्य लक्षणें .
पक्वजाम्बवसंकाशं यकृत्पिण्डनिभं तनु ॥
घृततैलवसामज्जावेसवारपयोदधि ॥१४॥
मांसधावनतोयाभं कृष्णं नीलारुणप्रभम् ॥
मेचकं कर्बुरं स्निग्धं चन्द्रिकोपगतं धनम् ॥१५॥
कुणपं मस्तुलुङ्गाभं दुर्गन्धं कुथितं बहु ॥
तृष्णादाहाऽरुचिश्वासहिक्कापार्श्वास्थिशूलिनम् ॥१६॥
संमूर्च्छारतिसम्मोहयुक्तं पक्ववलीगुदम् ॥
प्रलापयुक्तं च भिषक् वर्जयेदतिसारणम् ॥१७॥
ज्या अतिसार झालेल्या रोग्याचा मळ ; पिकलेल्या जांभळाच्या रंगासारखा , यकृताच्या रंगाचा ( उदी रंगाचा ), निळसर काळा , काळा , निळ्या व शेंद्ररी रंगाचा , तर्हतर्हेच्या रंगाचा आनि तेल , तूप , चरबी , मज्जा , वेसवार१ , दूध , दही व मांस धुतलेले पाणी यांच्या रंगापैकी कोणत्याहि रंगाचा असून जो तुळतुळीत , घट्ट , डोक्यातील मजेप्रमाणे पुष्कळ व मोराच्या पिसावरील डोळ्याप्रमाणे चकाकणारा पुष्कळ असतो आणि त्यास प्रेताच्या वासाप्रमाणे व कुजट अशी घाण येते , शिवाय तहान लागणे , दाह होणे , अरुचि , दमा होणे , उचकी येणे , बरगडयांच्या हाडास ठणका लागणे , गुदद्वराच्या वळ्या पिकणे , पूर्च्छा , अस्वस्थपणा , बेशुद्धि आणि बडबड ही लक्षणे ज्यास होतात तो रोगी असाध्य समजून वैद्यानें सोडावा .
दुसरीं असाध्य लक्षणें .
ससंवृतगुदं क्षीणं दूराध्या२नमुपदुतम् ॥
गुदे पक्वे गतोष्माणमतिसारिणमुत्सृजेत् ॥१८॥
वर सांगितलेल्या अतिसाराच्या असाध्य लक्षणाखेरीज आणखी काही लक्षणें आहेत , त्यावरूनहि वैद्याने अतिसाराची चिकित्सा करू नये , ती लक्षणे येणेप्रमाणे :--- रोग्याच्या गुदद्वाराचा पाक होतो व ते मिटत नाही , तो क्षीण होतो , पोटाला फुगवटी फार येते , सूज वगैरे उपद्रव उत्पन्न होतात आणि सर्वांग गार पडते .
अतिसारांत होणारे उपद्रव .
शोथं शूलं ज्वरं तृष्णां श्वासं कासमरोचकम् ॥
छर्दि मूर्च्छां च हिक्कां च द्दष्टातीसारिणं त्यजेत् ॥१९॥
श्वासशूलपिपासार्तं क्षीणं ज्वरनिपीडितम् ॥
विशेषेण नरं वृद्धमतिसारो विनाशयेत् ॥२०॥
सूज , शूल , ताप , तहान , श्वास , खोकला , अरूचि मूर्च्छा , ओकारी , उचकी असे दहा प्रकारचे उपद्रव अतिसारांत होतात ; त्यापैकी श्वास , शूल , तहान आणि ताप हे उपद्रव अतिसारी रोग्यास झाले असून तो क्षीण झाला असेल व विशेषेकरून वृद्ध असेल , तर तो रोगी चिकित्सा करून जगणार नाही असे समजून वैद्याने सोडावा .
रक्तातिसाराचीं लक्षणें .
पित्तकृन्ति यदात्यर्थं द्रव्याण्यश्नाति पैत्तिके ॥
तदोपजायतेऽभीक्ष्णं रक्तातीसार उल्बण : ॥२१॥
रक्तातिसार म्हणून पित्ततिसागचाच एक भयंकर प्रकार आहे ; तो पित्तातिसार व्हावयाचा असून किंवा झाला असून जर रोग्याने पित्तकारक पदार्थ पुष्कळ व वारंवार सेवन केले तर उत्पन्न होतो .
प्रवाहिकेची संप्राप्ति .
वायु : प्रवृद्धो निचितं बलासं नृदत्यधरतादहिताशनस्य ॥
प्रवाहतोऽल्पं बहुशो मलाक्तं प्रवाहिकां तां प्रवदन्ति तज्ज्ञा : ॥२२॥
रोग्याने अपथ्य सेवन केले असता त्याचा वायु कुपित होऊन तो सांचलेल्या कफाला मलमिश्रित करून गुदद्वारावाटे पडतो , त्या रोगास प्रवाहिका३ म्हणतात . यांत मल पडत नाही म्हटले तरी चालेल , रोगी फारच कुंथला तर मात्र थोडासा मल पडतो .
प्रवाहिकेचीं लक्षणें .
प्रवाहिका वातकृता सशूला पितात्सदाहा सकफा कफाश्च ॥
सशोणिता शोणितसम्भवा च ता : स्नेहरूक्षप्रभ्वा मतास्तु ॥
तासामतीसारवदादिशेच्च लिङ्गं क्रमं चामविपक्कतां च ॥२३॥
प्रवाहिका वातदोषापासून उत्पन्न झाली असली तर रोग्याच्या पोठांत मुरडा फार होतो , पित्तापासून उत्पन्न झाली असली तर त्याच्या अंगाचा दाह होतो ; कफापासून झाली असली तर गुदाद्वारावाटे कफ पडतो व रक्तापासून असली तर रक्तच पडते . ( वातादि ) दोषांच्या लक्षणांवरून तिचे वातजा , पित्तजा , कफजा व रक्तजा असे निरनिराळे प्रकार करून ते , पहिली रूक्ष पदार्थ खाल्लयामुळे ; दुसरी स्निग्व पदार्थ खाल्लयाने आणि तिसरी व चवयी तीक्ष्ण व आंबट पदार्थ भक्षण केल्याने , या कारणांनी उत्पन्न होतात असे मानतात . त्याचीं लक्षणे . चिकित्सा , अपक्वावस्था व पक्वावस्था या गोष्टी त्या त्या प्रकारच्या अतिसाराप्रमाणे जाणाव्या .
अतिसार गेल्याची लक्षणें .
यस्योच्चारं विना मूत्रं सम्यग्वायुश्च गच्छति ॥
दीप्ताग्नेर्लघुकोष्ठस्य स्थितस्तस्योदरामय : ॥२४॥
मूत्र होते वेळी मलप्रवृत्ति न होणे , अपानवायु चांगला सरणे , भूक लागणे न कोठा हलका होणे , ही लक्षणे रोग्याच्या ठायी उत्पन्न झाली म्हणजे त्याचा अतिसार बरा झाला असे म्हणावे .