प्रमेहाचीं कारणें .
आस्यासुखं स्वप्नसुखं स्वप्नसुखं दधीनि ग्रम्योदकानूपरसा : पयांसि ॥
नवान्नमानं गुडवैद्यतंच प्रमेहहेतु : कफकृच्च सर्वम् ॥१॥
एकसारखे बसून राहणे व झोप घेणे , ग्राग्य ( मग ते कोंबडा , बकरा वगैरे मनुष्यांनी पाळलेले असोत किंवा कावळा वगैरे मनुष्यवस्तीच्या आश्रयाने राहिलेले असोत ) प्रा ण्यांचे , पाण्यांतील ( मासे वगैरे ) जीवांचे अथवा आनूप ( झाडी व पाणी फार असलेल्या ) प्रदेशांतील प्राण्यांचे मांस खाणे , आणि दही , दूध , मांसरम , ( पुरण वगैरे ) गुलाचे बनविलेले पदार्थ , तसेच नवे अन्न , नवे पाणी आणि कफकारक गदार्थ यांचे सेवन करणे या सर्व गोष्टी प्रमेह अथवा मेह होण्यास कारण होतात .
कफ - पित्त - वात - मेहांची संप्राप्ति व प्रकार .
मेदश्च मांसं च शरीरजं च क्लेदं कफो वस्तिगत : प्रदूष्य ॥
करोति मेहान्समुदीर्णमुष्णैस्तानेव पित्तं परिदूष्य चापि ॥२॥
क्षीणेषु दोषेष्ववकृष्य धातून सन्दूष्य मेहान् कुरुतेऽनिलश्च ॥
साध्या : कफोत्था दश पित्तजा : षद् याप्या न साध्या : पवनाच्चतुष्का : ॥३॥
समक्रियत्वाद्विषमक्रियत्वान्महात्ययत्वाच्च यथाक्रमं ते ॥
कफ , पित व वात या तीन दोषांपासून प्रमेहाचे मुख्य तीन प्रकार होतात . ते - बस्तिंगत कफाने मांस , मेद व शरीरांतील क्लेद यांस दूषित असल्यामुळे होणारा कफप्रमेह ; उष्ण पदार्थांच्या सेवनामुळे प्रकोप पावलेल्या पित्ताने त्यासच ( मांसादिकांस ) दूषित केल्यामुळे उद्भवणारा पित्तप्रमेद आणि कफ व पित्त या दोषांचे बल कमी झाल्यामुळे प्रकुपित अशा वायूने ( त्याच ) धातूंना क्षीण करून उत्मन्न केलेला वातप्रमेह याप्रमाणे असून यांचेही आणखी दुसरे पोटप्रकार आहेत व कफ प्रमेहाचे दहा , पित्त - प्रमेहाचे सहा व वात - प्रमेहाचे चार मिळून एकंदर वीस जाणावे . यांपैकी कफजन्य दहा साध्य होतात ; पित्तजन्य सहा याप्य होऊन राहतात आणि वातजन्य चार असाध्य असतात . कफजन्य सर्व मेह साभ्य असल्याचे कारण असे की , त्यांत कफदोष व मेदादि दूषित धातू ता दोहोंस एकच क्रिया लागू पडते . जसे - तिखट , कडवट पदार्थ हे जसे कफशामक असतात तसेच ते मेदादिकांचा दोषही हरण करतात . पित्तजन्य मेहांत विषम चिकित्सा करावी लागते म्हणून ते याप्य होऊन रहातात . ( जसे - शीत व मधुर अशा पदार्थांच्या सेवनाने पित्तदोष शमतो पण त्यामुळे मेदादिक दूष्ये अधिक दूषित होतात .) आणि वातजन्य मेहांत तर मज्जादि बातूंचा अत्यंत क्षयच झालेला असतो ; यामुळे त्यावर मुळी चिकित्साच करता येत नाही व ते असाध्य होतात .
प्र मे हातील दोष व दूष्यें .
कफ : सपित्तं पवनश्च दोषा मेदोस्नशुक्राम्बुवसालसीका : ॥
मज्जारसौज : पिशितं च दूष्या : प्रमेहिणां विंशतिरेव मेहा : ॥
प्रमेहांत कफ , पित्त व वात हे दोष आणि मेद , रक्त , शुक्र , उदक , चरबी , मज्जा , ओज , अन्नरस , लस आणि मांस ही दूष्ये ( दूषित होणार्या धातु ) जणावी . या दोष व दुष्यांमुळे वर सांगितलेले वीस प्रकारचे प्रमेह होतात .
प्रेमहाचें पूर्वरूप व सामान्य लक्षणें .
दन्तादीनां मलाढयत्वं प्राग्रूपं पाणिपांदयो : ॥
दाहश्चिक्कणता देहे तृटश्वासश्चोपजायते ॥
सामान्यलक्षणं तेषां प्रभूताविलमूत्रता ॥५॥
दोषदूष्याविशेषेऽपि तत्संयोगविशेषत : ॥
सूत्रवर्णादिभेदेन भेदो मेहेषु कल्प्यते ॥६॥
प्रमेह रोग होण्यापूर्वी रोग्यावी जीभ , टाळू व दात यावर पुष्कळ मळ जमतो , हातापायांचा दाह होतो . अंगास चिकटपणा येतो आणि तहान व श्वास हे प्रकारही असतात ; आणि तो झाल्यावर त्यास सुख्यत्वेकरून गढूळ व पुष्कळ अशी लघवी होते . आता सर्व प्रकारच्या प्रमेहांत जरी हेच सामान्य लक्षण असते व दोष आणि दूष्ये यात काही निराळा फाक द्दष्टीस पडत नाही , तरी त्यांच्या संयोगभेदाने , जे मूत्राचे रंग वरैरे बदलतात त्यावरून त्याचे तितके ( वीस ) प्रकार होतात .
कफजन्य दहा प्रमेहांचीं निरनिराळीं लक्षणें . व नांवे .
अच्छं बहु सितं शीतं निर्गन्धमुदकोपमम् ॥
मेहन्युदकमेहेन किञ्जिदाविलपिच्छलम् ॥७॥
इक्षोरसमिवात्यर्थं मधुरं चेक्षुमेहत : ॥
सान्द्रीभवेत् पर्युषितं सान्द्रमेहेन मेहति ॥८॥
सुरामेही सुरातुल्यमुपर्यच्छमधो घनम् ॥
संहष्टरोमा : पिष्टेन पिष्टवद्वहुलं सितम् ॥९॥
शुक्राभं शुक्रमिश्रं वा शुक्रमेही प्रमेहति ॥
मूर्ताणून्सिकतामेही सिकतारुपिणो मलान् ॥१०॥
शीतमेही सुबहशो मधुरं भृशशीतलम् ॥
शनै : शनै शनैर्मेही मन्द मन्दं प्रमेहति ॥११॥
लालातन्तुयुतं मूत्रं लालामेहेन पिच्छिलम् ॥१२॥
कफजन्य दहा मेहापैकी पहिला उदकमेह यांत पाण्यासारखे स्वच्छ , पुष्कळ पण किंचित् गद्वळ , पांढरे , थंड , घाण नसलेले व बुळबुळीत असे मूत्र होते ; दुसरा इक्षुमेह यांत उसाच्या रसाप्रमाणे अतिशय गोड मूत्र होते ; तिसरा सांद्रमेह , यांत होणारे मूत्र भांडयात बरेच वेळ ठेवले तर दाट होते . चवथा सुरामेह , यांत झालेले मूत्र खाली दाट व वरती मद्याप्रमाणे पातळ असते ; पांचवा पिष्टमेह , यांत पाण्यांत कालवलेल्या पिठाप्रमाणे दाट , पांढरे व पुष्कळ मूत्र होत असून लध्वी करतेवेळी रोग्याचे अंगावर कांटा येतो , सहावा शुक्रमेह , यांत होणार्या मूत्रांत शुक्र , मिश्र झालेले असते , सातवा सिकतामेह , यांत लध्वीचे वेळी दोषाचे कण बारीक वाळूसारखे पडतात . आठवा शीतमेह , यांत वारंवार लध्वीला होते व मूत्र गोड व अतिशय थंड असते , नववा शनैमेंह , यांत लध्वी करताना सावकाश व थोडे थोडे असे मूत्र बाहेर पडते , आणि दहावा लालामेह , यांत होणारे मूत्र बुळबुळीत व लाळेप्रमाणे तंतुयुक्त झालेले असते .
पित्तजन्य सहा मेहांचीं नांवें व लक्षणें
गन्धवर्णरस्स्पर्शै : क्षारेण क्षारतोयवत् ॥
नीलमेहेन नीलाभं कालमेही मषीनिभम् ॥१३॥
हारिद्रमेही कटुकं हरिद्रासन्निभं दहत् ॥
विस्नं माञ्जिष्ठ मेहेन मञ्जिष्ठासलिलोपमम् ॥१४॥
विस्नमुष्णं सलवणं रक्ताभं रक्तमेहत :
पित्तमेहाच्या सहा प्रकारांपैकी पहिल्या क्षारमेहांत होणार्या मूत्रास क्षारोदका सारखा वास , रंग , रुचि व स्पर्श हे असतात , दुसर्या नीलमेहांत होणार्या मूत्राचा रंग चाष पक्ष्यासारखा निळा होतो ; तिसर्या कालमेहांतील मूत्र शाईसारखे काळे असते . चवथ्या हारिद्रमेहांत हळदीसारखे पिवळे , जळजळीत व तिखट असे मूत्र होते . पांचव्यां मांजिष्ठमेहांत कच्च्या मांसाची घाण मारणारे व मंजिष्ठेच्या काढयासारखे झालेले मूत्र द्दष्टीस पडते ; आणि सहाव्या रक्तमेहांत लध्वीच्या वेळी रक्तासारखे लाल , कढत , खारट व अत्यंत घाण मारणारे मूत्र बाहेर येते .
वातजन्य चार मेहांचीं नांवें व लक्षणें .
वसामेही वसामिश्रं वसाभं मूत्रयेन्मुहु : ॥
मज्जाभं मज्जमिश्रं बा मज्जामेही मुहुर्मुहु : ॥१५॥
कषायं मधुरं रुक्षं क्षौद्रमेहं वदेदुध : ॥
हस्तीमत्त इवाजस्नं मूत्रं वेगविवर्जितम् ॥१६॥
सलसीकं विबद्धं च हस्तिमेही प्रमेहति ॥
वातजन्य मेहाचे चार प्रकार आहेत , पैकी पहिल्यातील मूत्र चरबीने युक्त अथव चरबीच्या रंगाचे आणि वारंवार होणारे असे असते ; दुसर्यातील ( मूत्र ) मज्जयुक्त अथवा मज्जेसारखे आणि तसेच वारंवार होणारे असे असते . तिसर्यातील ( मूत्र ) तुरट , मधुर व रूक्ष असते , आणि चवथ्यांतील ( मूत्र ) माजलेल्या हत्तीच्या मूत्रासारखे , वारंवार वेगरहित , लसयुक्त व लध्वीच्या वेळी अडकत बाहेर येणारे असे असते . या चारी प्रकारांची वसामेह , मञ्जमेह , क्षौद्रमेह व हस्तिमेह ही चार नावे क्रमाने जाणावी .
कफमेहांतील उपद्रव .
अविपाकोऽरुचिश्चछर्दिर्ज्वर : कास : सपीनस : ॥
उपद्रवा : प्रजायन्ते मेहानां कफजन्मनाम् ॥१७॥
कफजन्य दहा मेहात अन्नाचे अपचन , अरुचि , ज्वर , ओकारी , पडसे व खोकला ह उपद्रव उद्भवतात .
पित्तमेहांतील उपद्रव .
बस्तिमेहनयो : शूलं मुष्कावदरणं ज्वर : ॥
दाहस्तृणाम्लिका मुर्च्छा विडभेद : पित्तजन्मनाम् ॥१८॥
पित्तजन्य सहा मेहांत होणारे उपद्रव - मूत्रशय वा शिश्र यांमध्ये टोचल्यासारख्या वेदना होणे व वृषणावरची त्वचा पिवून पाटणे ; तसेच ज्वर , तहान , दाह व मळ पातळ होणे , मूर्च्छा व आंबट ढेकर येणे - अशा प्रकारचे असतात .
वातमेहांतील उपद्रव .
वातजानामुदावर्तकण्ठहृद्ग्रहलोलता : ॥
शुलमुन्निद्रता शोष : कास : श्वासश्व जायते ॥१९॥
शूल , उदावर्त , निद्रानाश , सका खोकला , शोष , श्वास , गळा व हृदय यांचा रोग आणि सर्व प्रकारचे रस खाण्यविषयी वासना हे उपद्रव चारी प्रकारच्या वातजन्य मेहात उत्पन्न होतात .
मेहांचीं असाध्य लक्षणें .
यथोक्ते पद्रवाविष्टमतिप्रस्नुतमेव च ॥
पिटिकापीडितं गाढ : प्रमेहो हन्ति मानवम् ॥२०॥
जात : प्रमेही मधुमेहिनो न साध्य ऊक्त : स हि बीजदोषात् ॥
ये चापि केचित् कुलजा विकारा भवन्ति तांश्च प्रवदन्त्यसाध्यान् ॥२१॥
ज्यात वर सांगितलेले अपचनादि उपद्रव व पुढे सांगितलेल्या शराविकादि पिटिका उद्भवतात ; तसेच मूत्रस्राव फार होतो आणि रोग अंगात मुरून राहतो ; तो प्रमेह रोग्यास मारक होतो ; आणखी मधुमेह झालेल्या रोग्याच्या संततीत उद्भवलेला जो प्रमेह तो बीजदोषामुळे असाध्य होतो . याप्रमाणेच रोग्यास कुलपरंपरेने जे जे ( कुष्ठशूलदिक ) रोग प्राप्त होतात तेही कधी बरे होणारे नसतात असे वैद्यशास्त्रज्ञ म्हणतात .
सर्व एव प्रमेहास्तु कालेनाप्रतिकारिण : ॥
मधुमेहत्वमायान्ति तदाऽसाध्या भवन्ति हि ॥२२॥
प्रमेह अथवा मेह याचे सर्व प्रकार जर त्यांची उपेक्षा झाली ( म्हणजे त्यांजवर योग्य चिकित्सा न झाली ) तर काही काळाने मधुमेहाचे स्वरूप पावतात आणि मग असाध्य होतात .
मधुमेह म्हणजे काय ?
मधुरं यच्च मेहेषु प्रायो माध्वेव मेहति ॥
सर्वेऽपि मधुमेहाख्या माधुर्याच्च तनोरत : ॥२३॥
सर्वच प्रमेह मधुमेह म्हटले जातात . कारण सर्वच प्रमेहांतील मूत्र प्राय : मधासारखे गोड असते व रोग्याच्या शरीरालाही गोडी येते ; म्हणून प्रमेह म्हणजे बहुतकरून मधुमेहच समजतात . त्याची लक्षणे व प्रकार पुढे सांगितल्याप्रमाणे जाणावे .
मधुमेहाचे प्रकार व लक्षणें .
मधुमेहे मधुसम जायते स किल द्विधा ॥
क्रुद्वे धातुक्षयाद्वायौ दोषावृतपथेऽथवा : ॥२४॥
आवृतो दोषलिङानि सोऽनिमित्तं प्रदर्शयन् ॥
क्षीण : क्षणात् क्षणात् पूर्णो भजते कृच्छ्रसाध्यताम् ॥२५॥
मधुमेहात मूत्र मधासारखे होते व तो दोन प्रकारचा असतो ; पैकी पहिला प्रकार धातुक्षयामुळे वायु प्रकोप पावून उत्पन्न होतो , आणि दुसरा पित्त व कफ या दोषांनी वायूचा मार्ग आवूत केल्यामुळे उद्भवतो ; या दुसर्या प्रकारच्या आवृत वायूमुळे होणार्या मधुमेहात आवृत करणारा जो दोष ( पित्त किंवा कफ ) असेल त्याची लक्षणे अकस्मात् उत्पन्न होतात व तो घटकेत कमी व घटकेत जास्ती झालेला द्दष्टीस पडतो . मधुमेहाचा हा प्रकार कष्टसाध्य समजावा .